तुमचं समदं खरं हाय ! पण माझं काय ?
तुमचं
समदं खरं हाय ! पण माझं काय ?
माननीय महोदय तुमचं सारं काही खरं झालं, माझा
महाराष्ट्र, माझा देश हा विकासाच्या उंबरठ्यावर आहे. असं तुम्ही जाहिरातींमधून
आम्हा शेतकऱ्यांना सांगता. पण, मला या विकास जो काय असतो त्याबाबत थोडं मन मोकळं
करायचं आहे. माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी. पण, तुम्ही म्हणता शेतकऱ्यांचा
विकास झाला, तुम्हाला कुठे दिसला हो शेतकऱ्याचा विकास ? तुम्ही साधी कर्जमाफी
करायला, अभ्यास करत बसला होता ! खरंच अभ्यास करण्याने कर्जमाफीचा गुंता सुटला का
हो ? तुम्ही बुलेट ट्रेन, विमानसेवा, रेल्वे
सेवा, रस्ते, उड्डाणपूलं वगैरे वगैरे, विकासाच्या बाता करता. पण, माझ्या अंगावरचे
मळकटलेले कपडे मात्र अजूनही बदलले नाहीत. याला आपण खरंच विकास म्हणणार का हो ? मला
एक सांगा ! शेतीमालाला भाव देण्यासाठी मला
प्रतिवर्षी संघर्ष करावा लागतो. त्याचा तिढा आजपर्यंत एकही प्रतिनिधी सोडवू शकला
नाही. खत बियाणे घ्यायचं म्हटलं की, दरवर्षी मला पहिल्या वर्षांपेक्षा जास्त दराने
मिळतात. याचा गंभीर्याने विचार तुम्ही कधी केलाय का ? महोदय, आम्हा शेतकऱ्यांना
शेतीव्यतिरिक्त इतर काहीही उत्पन्न नाही, आमच्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग हा शेती
आहे आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे, या कृषिप्रधान देशांमध्ये शेतकरी आत्महत्या
करतोय ! याविषयी कोणीही गंभीर नाही, याचं फार दुःख वाटतं. मला सांगा महोदय ! आत्महत्या
करनं आम्हाला गोड वाटतं का ? आत्महत्या केल्यास माझे सारे प्रश्न सुटतात का हो ? महोदय, माझी कारभारीन उघड्यावर येते, माझा
संसार उघड्यावर येतो, माझी मुलं बाळं पोरकी होतात, याचा विचार कधी करणार हो तुम्ही
? सारखं सारखं तुम्हाला माझ्या व्यथा सांगनं मलाही आता अवघड वाटायला लागलं आहे.
मलाही आता या गोष्टीचा वीट आला आहे. तुम्ही म्हणताय शेती करायला त्यासोबत एखादा
जोडधंदा करा ! पण ,जोड धंदा करायला कर्ज मिळवून देण्याची सोयीस्कर व्यवस्था तुम्ही
केलीत का आमच्यासाठी ? खरं सांगा महोदय, बँकेत गेल्यावर बँक मॅनेजर आम्हाला
हुसकावून लावतो. हे तुम्हाला माहीत आहे का ? सातबारा कोरा करण्यासाठी तुम्ही पाच वर्षे
घालवली, तुमचा अभ्यास सलग पाच वर्षे चालला, या पाच वर्षात माझे शेतकरी बांधव
कितीतरी जग सोडून गेले, याचे काहीच दुःख वाटले नाही का हो तुम्हाला ? बाजारामध्ये
आता माझ्याकडे कपडे घ्यायला सुद्धा पैसे नाहीत, आता फक्त लंगोट उरली आहे त्या
लंगोटीवर आणि अर्ध्या भाकरीवर दिवस काढतोय मी. तुमच्या डिजिटल इंडियामध्ये माझं
मरण दिसतंय मला ! देशाने, राज्याने डिजिटल इंडियामध्ये प्रगती केली. देश
प्रगतीपथावर आहे. हे सगळं चांगलं झालं साहेब ! पण माझं काय चुकलं ? मी कधी
प्रगतीपथावर जाणार ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार ? शेतकऱ्याला पोटभर खायला
कधी मिळणार ? शेतकऱ्याला न्याय कधी देणार ? तुमच्या डिजिटल इंडियामध्ये
शेतकऱ्याचाही सहभाग कधी असणार ? तुमचं समदं खरं झालं ! माझं काय ? विचार करा महोदय
...
- एका शेतकऱ्याचे महोदयांना पत्र
- एका शेतकऱ्याचे महोदयांना पत्र
- शंकर चव्हाण , अंबाजोगाई 9921042422
Comments
Post a Comment