आई माझी मायेचा सागर …



आई माझी मायेचा सागर …

या विश्वात असं एकच न्यायालय आहे जिथं सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई. आई म्हणजे मायेचा सागरं आहे, समुद्र पाहतांना डोळयाची नजर जिथवर जाईल तिथवर समुद्र दिसतो म्हणजे समुद्र आपल्या डोळयात देखील मावत नाही त्यापेक्षाही कितीतरी पटीने आपली आपल्या लेकराला जीव लावते. तिच्या जीवापेक्षाही जास्त ती आपल्या लेकरांवर प्रेम करते. तिलां असं वाटतं की, माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे. मातृत्व ज्या स्त्रीला मिळालं त्या स्त्रीला जाऊन विचारा आई झाल्यावर काय समाधन मिळतं. आई होणं एवढं सोप्पं काम नाही. कारण आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आई एक साक्षात्कार आहे. साक्षात परमेश्वर सुध्दा आजपर्यंत आईची जागा घेऊ शकलेला नाही. देवाला प्रत्येक व्यक्तीवर माया, प्रेम व सांभाळ करता येत नाही म्हणून त्याने आई बनवली. त्यामुळे प्रत्येकाला आई मिळाली. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरी आईची व्याख्या लिहून होणार नाही असं हे आईचं प्रेम आहे. जे प्रेम जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. आईची माया ही ज्याला समजली तो धन्य झाला. कारण नशिबानं ज्यांच्याकडं आई आहे ते खुप भाग्यवान आहेत. ज्याच्याकडं आई नाही त्याला जाऊन विचारा आई नसल्याने काय दु:ख होते. तो सांगेल  माझ्याकडं आई नाही त्यामुळे माझ्याकडं कितीही संपत्ती धनदौलत असली तरी सुध्दा मी भिकारीच आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं प्रसिध्द कवी यशवंत यांनी लिहून ठेवलं आहे. त्यांनी आईची व्याख्या तयार केली. आई म्हणजे ममता, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. जीच्यामुळं आपण जग पाहतो. तिचे उपकार या जन्मी तरी फेडणं शक्य नाही, याच जन्मी काय सात जन्म घेतले तरी तिचे आपल्यावरील हे उपकार कधीच फेडणं शक्य नाही. आई आपल्या लेकरांचं संगोपन एवढया चांगल्या पध्दतीने करते की, लेकरांना कळतं होईपर्यंत कशाचीही कमी पडू देत नाही. पण आज परिस्थिती उलट पहावयास मिळत आहे. मातृदिनाच्या निमित्ताने आईविषयी चांगल्या गोष्टी सोशलमिडीयावर पसार होत आहेत. त्यात काही जणांनी आईसोबत सेल्फी काढून सोशल मिडीयावर शेअर केले. आईवरील प्रेम हे फक्त सोशलमिडीयाच्या चौकटीपुरते मर्यादीत राहू नये.  दुर्देव असं आहे की, जोपर्यंत विश्वामध्ये वृध्दाश्रम सुरु राहतील तोपर्यंत आई विषयी कोणाच्याही मनात प्रेम नाही असं म्हणावं लागेल, त्या आश्रमात  कोणाचीही आई असो. आपण आपल्या आईपुरतेच विचार करायला संकुचित विचाराचे नाही आहोत. जगाच्या पाठीवरील कोणाचीही आई वृध्दाश्रमामध्ये दु:ख भोगत असेल तर आपल्या सर्वांसाठी ही शरमेची व मान खाली घालायला लावणारी बाब आहे. ज्यांना आई नाही अशांनी वृध्दाश्रमामधून तिथें दु:खाने पीडत असलेल्या आईवडीलांना घरी घेऊन आणून त्यांचा सांभाळ केला तर देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास जगामध्ये एकही वृध्दाश्रम अस्तित्वात राहणार नाही. त्याची गरजच उरणार नाही. माणूस हल्ली संकुचित विचाराचा झाला आहे. आई वडीलांना उलट बोलणे, त्यांचा अपमान वाटणे, त्यांना कमी लेखणे असे प्रकार संकुचित वृत्तीच्या सुशिक्षीत लोकांच्या डोक्यात विचार भरलेले आहेत. पण एवढं लक्षात ठेवा आई वडीलांची बरोबरी कोणीही करु शकनार नाही. अनेक वृध्दाश्रमंक असे आहेत की, जे फक्त शासकीय अनुदानापोटी सुरु करण्यात आलेले आहेत. तिथे त्या वृध्दांचा सांभाळ होत नाही. उच्चशिक्षीत तरुण तरुणी आपल्या सासू सारऱ्यांना अतिशय हीन वागणूक देत आहेत. असे अनेक उदाहरणं पहावयास मिळतील. पण त्यांचा मुलगा मात्र हा सर्व कार्यक्रम उभ्या डोळयानं बायकोच्या पदाराआडून पहात असतो. अशा मुलांची खरंच कीव येते. जे आईवडीलांसाठी लग्नापूर्वी मी हे करीन, ते करी अशी स्वप्नं दाखवतात व लग्नानंतर त्या मातृतुल्य माय माऊलीचे हा एवढे हाल होता., अशी काही उदाहरणं आहेत की, मुलगा विदेशी, बाहेरगावी असतांना आईला शेवटचं पाहणं सुध्दा किंवा तिचे अंत्यसंस्कार सुध्दा मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो आई ही शोभेची वस्तू नाही. मातृदिन हे फक्त एक डिजीटल युगातलं फॅड आहे. खरं तर मातृदिन हा रोजंच असतो. आईवरील प्रेम दाखवण्यासाठी कोण्या एका दिवसाची गरज नसतेच मुळी. मदर्स डे हा रोजच आपण साजरा करु शकतो. आई वडीलांसाठी एखादी गोष्ट केली म्हणून सोशल मिडीयावर प्रसध्दिीपोटी काही जण पोस्ट व फोटो शेअर करतात. पण हे चुकीचे आहे. जन्म झाल्यापासुन ते मुलं स्वत:च्या पायावर उभे राहिपर्यंत त्या माय आणि बापाने मुलांच्या नकळत अनेक गोष्टी त्यांच्या साठी केलेल्या असतात. पण त्याचा गावभर त्यांनी दिंडोरा कधीही पिटलेला नसतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. कधीही आपल्या मुलाचे लाड पुरवले पण त्याचे सोशल मिडीयावर कधीही प्रसिध्दी नाही केली. आईने आवडीचे पदार्थ रोज खायला करुन घातले. लोकाच्या चाकऱ्या केल्या, कामाला जाऊन स्वत: अर्धपोटी उपाशी राहून आपली मुलं शिकली पाहिजेत म्हणून कष्ट केले, पण एका शब्दाने ती माय माऊली कधी म्हणाली नाही की, मी तुमच्यासाठी एवढं केलं. मित्रांनो आईचं काळीज ओळखायला मोठं मन लागतं. तिची लेकरं थोडी बहुत स्वत:च्या पायावर उभी राहू लागतात आणि मायबापांना लगेच म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं ? ये आई तुला काय कळतं यातलं ? अरे असं जन्मदात्या माय माऊलीला शब्द वापरतांना तुमची जिभ का नाही झडली. त्यांनी हे सुंदर जग दाखवलं तेच पुरेसं आहे तुमच्यासाठी, लहानाचं मोठं केलं, तुमचे लाड केले, तुम्हाला हवं ते दिलं, तुमच्यासाठी अनेक ठिकाणी पायऱ्या झिजवल्या आणि वरुन म्हणता आई वडीलांनी आमच्यासाठी काय केलं ?  हे कुठं तरी थांबलं पाहिजे. मदर्स डे दिवशीच फक्त आईवरील प्रेम, आईबद्दल आपुलकी, माया याचा उत येऊ देऊ नका. हे सर्व तुमच्या मना ठेवा तिचा सोशल मिडीयावर स्वत:चा चांगुलपणा व लाईक व कमेंट्स साठी मायमाऊलीचा शोभेची वस्तु म्हणून वापर करणं थांबवा. रात्रीचा दिवस करुन आपल्याला लहानाचं मोठं केलं. तिनं असंख्य वेदना सहन करुन आपला सांभाळ केलेला असतो. तिच्या इतकं या विश्वात कोणीही मोठं नाही. त्यामुळे मायमाऊलीचा नीट सांभाळ करा. तरच मातृदिन खराखुरा दररोज साजरा हाईल. आई हा मायेचा सागर आहे हे कधीही विसरु नका.
- शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)

Comments

  1. Superbb and selected concept as always...Loved it👌👌👍🙏

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?