लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..
लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..
पहाटे पहाटे जीवा शिवाची बैल जोडं…… असं गाणं म्हणत चार पाच च्या सुमारास गणपत रोज उठायचा, नांगर घेऊन शेतात नांगरत असे, लवकर लवकर शेतातलं काम आटोपून, आपल्या बैलजोडीला वैरण काडी करुन, बरोबर सात वाजता घरी यायचा हात पाय धुवायचा अन् बायकोला म्हणलायचा अगं ए कारभारणी रातीचं पिठलं अन् शिळी भाकर हाय का ? बाको लाडात येऊन म्हणायची आवं कारभारी आहे त्या दुरडीत घ्या अन रानातच जाऊन खावा. भाकरी आणि रातीचं पिठलं घरच्यापरीस रानातच गोड लागतय. हसून खेळुन दिवस जायचे. घरची सुखाची मीठ भाकरी खाऊन गणपत व त्याची कारभारीन सुखानं संसाराचा गाढा ओढत होते. रानात सगळीकडं हिरवळ पहावयास मिळायची वेळेवर पेरण्या व्हायच्या, वेळेवर शेतातली सर्व कामे आटपायची, शेतात पिकवलेला माल तातडीने आडती दुकानादारांडे नेऊन विकून त्यात मिळालेला पैका पाहिजे तेवढा वर खर्चासाठी ठेऊन उरलेला जीभेला आवर घालून, काळजाला कुलूप लावून पुढील आयुष्यासाठी जतन करुन बँकेत ठेवायचा. अशा पध्दतीनं जवळ जवळ पाच वर्षे उलटून गेली होती. घरात तान्ह बाळ जन्माला आलं. ते गोंडस होतं. पहिलंच मुल म्हणून गणपतंने त्याचे लाड, हौस-मौस करण्यात कसलीच कसर नाही सोडली. शेतजमीन सुपीक होती, शेतात सर्वच माल गावरान (जुना मराठी शब्द) असायचा. त्यातच काही दिवस उलटले. राजकारण आणि शेती यांचा सबंध असतोच त्याच प्रमाणं दिवसेंदिवस होणाऱ्या वृक्षतोडीमुळं पाऊस वेळेवर पडत नव्हता पूर्वीसारखे दिवस आता राहिले नव्हते. पूर्वी दणादणा पाऊस पडायचा. पण हल्ली पावसाने पाठ फिरवली होती. गणपत हवालदिल झाला. त्यात सरकारच्या काही शास्त्रज्ञन का कोण यांनी निसर्गासोबतच प्रक्रिया करायचं ठरवलं होत. म्हणजे ते कृत्रीम पाऊस असं काही तरी करणार होते. नेमकं कृत्रिम पाऊस कसा असतो हे गणपतनं पहिल्यांदाच ऐकलं होतं. ठिक आहे सरकार आपल्यासाठी काही तरी करतंय म्हटल्यावर ते चांगलच असणार म्हणून त्यानं ते स्विकारलंही होतं. बि-बियाणे सुध्दा आता दुकांनामध्ये मिळू लागली होती. देश प्रगतीकडे चालला होता म्हणजे कमी वेळेत, कमी मेहनतीत जास्त पीक मिळणार होतं. त्यावर वैज्ञानिकांनी काही तरी प्रक्रिया केलेली असते असे एवढेच त्या गणपतला माहिती होतं. त्यानं ते पेरलं, ते उगवलं त्याचं पिक घेतलं,खरंच पहिल्यापेक्षा जास्त माल आला, पैसाही जास्त आला पण पहिल्या धान्याला जी चव होती ती राहिली नव्हती, फळं, पालेभाज्या, धन्य व इतर रासायनिक प्रक्रियेमुळं बेचव झाली होती. या सुरू असलेल्या सत्रामुळे जमीन सुदा हळू हळू नापिक होऊ लागली होती. नांगर पल्टी मारून मारुन जमीन उकरून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन जणू जमीनीसोबत बलात्कारच होत होत. सर्व कळत होते परंतू करणार काय पोटाला पोटभरही खायचं होतं. त्यात सगळीकडे हेच चाललेलं म्हणून पत्कारलं जे जमलं ते आपलं जे नाही जमलं ते सोडून दिलं होतं. अशीच आणखी बरीच वर्षे उलटून गेली कालांतराने पाऊस पडणं बदं झालं, अवेळी पाऊस पडू लागला, गारपीठ, सुसाट वारा त्यामुळं पिकांचं प्रचंड नुकसान, त्या वर्षी मात्र खरंच पाऊस पडलाच नाही. मग जे थोडं बहुत आलं होतं ते आलं, पदरात पडलं, विकाया नेलं, त्याचं पैकं मिळालं, तो ना बँकेत टाकता आला, ना पोटभर खळगी भरता आली. गणपत फार दु:खी झाला घरी आला, रागात होता. कारभारनीनं त्याच्या चेह-यावरील हावभाव पाहिला अन् विचारलं कारभारी काय झालं. तोंड पडलेलं कसं दिसतंय. गणपत राग गट गट गिळत होता. बायकोला सांगावं कि नाही असं त्याला वाटत होतं. घरी येईपर्यंत तो विचार करत होता की आता यापुढें निसर्गानं खरंच साथ सोडली तर खायचं काय अन् करायचं काय ? शेतात गेलं तर काळंभोर रान पांढरं दिसू लागलं होतं. पोटचं पोरगं बी आता मोठं झालं होतं. ते शाळेत जाऊ लागलं त्याला शाळेसाठी भला पैसा लागत असे. गणपत शेतीवर उपजिवीका करुन तो पुरवतही असे पण त्याला भ्रांत होती ती पुढील आयुष्याची, त्याच्याजवळ दुरदृष्टी होती. त्यानं सर्वकाही भविष्यकाळ ओळखला होता. गुण्या आणि धन्या त्याची बैलजोडी त्यांची अपुऱ्या चाऱ्यापाई पोटं खपाट झाली होती. उघडया डोळयानं गणपत पहाता होता. कडब्याची वरळ सुध्दा आता हळुहळू संपू लागली. पेंड बाजारातून आणायची म्हणलं तर पेंडीचे भाव गगनाला भिडले होते. भाव ऐकूनच गणपतचे कान फाटले. चिकाटी करुन उधार मागून त्या मुक्या जनावरांसाठी थोडं थोडं आणून पोटाला खायला घालत होता. त्या मुक्या जनावरांना पण कळून आलं होतं आता आपण जास्त दिवस नाही जगणार. दुष्काळाची परिस्थिती इतकी भयान झाली होती की जनावरांनाच काय माणसांना सुध्दा पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसे. पुढच्या वेळी पेरणीच्या वेळी गणपतकडे पैसा नव्हता त्यानं गावातील पाटील जो सावकारकी करत होत त्याच्याकडं गेला व पैसा घेतला. घेतेवेळेस त्याने झेपेल तेवढेच पैसे घेतले. कारण ते पैसे त्याला व्याजासकट परतही करायचे होते. पण जेव्हा तो बाजारात बी-बियाणे आणण्यासाठी गेला तेव्हा त्याने व्याजाने काढलेले पैसे अपुरे असल्यामुळे पहिल्यापेक्षा दुप्पट पैसे त्याला सावकाराकडून आणावे लागले. त्याने सावकाराकडून पैसे घेतले, बि-बीयाणे, खतं, रासायनिक औषधं, व आवश्यक साधनं घेतली. पेरणी केली, व दुपाराच्या टाईमाला झाडाखाली देणं कसं फेडायचं चिंतेत विचार करत बसला होता. सहा महिले उलटली मात्र पावसाचा आजून पत्ताच नाही. गणपत आता खरंच हवालदिल झाला होता. त्याला सावकाराचे कर्ज फेडण्याची भिती तर होतीच पण जास्त भिती होती ती स्वत:चं पोट कसं भरायचं, लेकरांची शिक्षणं कशी करायची, त्याला ना कुणाचा आधार होता ना कोणी गावात मदत करण्याइतपत कुणाची कुवत होती कारण सर्वत्र परिस्थिती ही सारखीच होती. उन्हाळयात जसं रस्त्यांनं चलतांना फुपुटा उडायचां तशी गत भर पावसाळयात झाली होती. त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र चालू होतं. त्यानंही मनात ठरवलं पण मन तयार होईना. आपण मेलोत तर आपल्या कुटूंबाकडं कोण लक्ष देईल असा तो नेहमी विचार करत असे. अशीच अडीच वर्षे उलटून गेली. गणपतवर कर्जाचा डोंगर झाला, त्यानं बायकोच्या गळयात मंगळसुत्राशिवाय काहीच ठेवलं नव्हतं. पैशापाई पोरगं सुध्दा शाळेत जात नसे. त्याची शाळा एका दुसऱ्या गावात होती. जाण्या येण्यासाठी आता गणपतजवळ पैसा नव्हता. संकटांनी त्याला हैराण केलं होतं. एके दिवशी बायकोला तो म्हणाला माझं जर काही बरं वाईट झालं तर …… तिच्या पोटात गोळाच आला, टचकन् डोळयातून पाणी आलं आन् गणपतला बिलगली अन् दोन तास हंबरडा फोडून रडत होती. तिला ते शब्द कानी येताच जणू तिचा मालक खरंच गेला असं तिच्या चेहऱ्यावर भाव उमटले व ती ढसा ढसा रडू लागली. गणपत म्हणला येडी हाय तू मी काय खरंच मरणार हाय व्हय, मला काय धाड भरल्याय. तशी ती शांत झाली, डोळे पुसू लागली. थोडी शांत बसली. गणपतने तिला पाणी दिलं. त्यांन विचार केला नाही आता आपण नाही मरायचं. जीवनाशी संघर्ष करायचा, लढायचं असा त्यानं निश्चय केला. काही दिवस उलटले, घरचे धान्य संपले, उसने पासने मागून झाले होते, उधार मागून झाले होते, पाहुणे राऊळयांकडून आणून झाले होते. मनातल्या मनात तो रडतच होता. काय करावे सुचत नव्हते. एक इसम कुठंतरी एकदा पेपर वाचत होता त्यात असं लिहिलं होतं की आत्महत्या केलेल्या ‘एका शेतकऱ्याला एक लाखांची मदत’ त्यानं विचार केला, खरंच मदत मिळते का, न राहून त्यानं त्या इसमाला विचारलंच त्यानं मान हालवून हो असं सांगितलं. गणपतच्या डोक्यात आता खेळ चालू झाला होता. तो फक्त आता सगळं आटोपून मोकळा होणार होता. त्यानं आता मन खंबीर करुन निश्चय केलाच होता. आता जगून तरी काय फायदा, बायको जाईल तिच्या माहेरी लेकराला घेऊन, मिळंल तो पैसा काही सावकाराचा देऊ अन बायकोला काय राहतील ते राहतील. पण असं होणार नव्हतं हे त्याला कुठं माहिती होतं. कारण या जगात कुणीच कुणाचं नसतं अशी एक म्हण आहे. गणपतला लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून त्याला मरतांना चिठी सुध्दा लिहिणं अवघड होतं आणि तो दिवस आलाच, रोजच्याप्रमाणे गणपत सकाळी लवकर उठला शेतात गेला, गोठयात गेला जनावरांना वैरण काडी केली. पाणी पाजलं, त्या बैलांच्या गळयात हात घालून त्यांच्या वर माया करु लागला. जनावरांना माहिती होतं आज काय होणार. त्या मुक्या जनावरांच्या डोळयातून पाणी यावं, ते मुकी जनावरं ढसा ढसा रडावी तशी पाण्याची धार डोळयातून निघावी, इतकी माया त्यांच्या मालकावर होती, मित्रहो याठिकाणी शब्दाच काय भावना, मन , सर्वच कमी आहे. असा प्रकार ज्यायासोबत होते त्याला किती रडू यावे त्याची काय अवस्था व्हावी ही त्यालाच माहित. पण त्यानं स्वत:ला आवरलं. जनावरं पायं खोडू लागले मालकाला नका नका म्हणत होती हे त्यालाही समजत होतं. टिवटीवी पक्षाचा आवाज आला त्यानंही ऐकला. तो म्हणाला नाही माझ्या सर्जा राजांनो मला जावं लागणार, माझी वेळ संपली आहे. ती मुकी जनावर गणपतला खुनवत होती. सांगत होती की मालक नका जाऊ आपण जास्त मेहनत करु. पण नाही. गणपत ने गोठयातील खुंटीला अडकवलेला त्याच जनावरांचा कासरा हातात घेतला आणि चालू लागला. बांधाच्या कडंनं चालत होत. कधी कधी मनात विचार येत होता की, आपण जे कारतोय ते योग्य नाही, चालत असतांना कारभारणीचा चेहरा डोळयासमोर येऊ लागलां, पोराच्या चेहऱ्यावरचं हास्याचं चित्र पाहून गणपच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं, पण तो चालतच राहिला. त्याच्या शेतातलं मधोमध ते लिंबाचं झाड आलं. ज्या झाडाला तो लटकणार होता. तो झाडावर चढला, गोठयातील जनावरांनी ते सांदीतून पाहिलं होतं. त्यांची धडपड सुरूच होती. पण ते काय करणार बिचारे शेवटी त्यांना दावणीला बांधलं होतं. तो झाडावर चढला अन् गळयात फास टाकून त्यानं उडी मारली. गळयाचा फास आवळताच आई गं किंचाळला त्यात बुबळं आणि जीभ बाहेर पडली अन् काही क्षणातंच तो अनंतात विलीन झाला. हे पाहताच बैलांनी दावणीला बांधलेली कासरे तोडले सैरा वैरा धावत ते लिंबाच्या झाडाखाली येऊन मालकाचे पाय चाटू लागले. शेवटी मुकं जनावर करणार तरी काय. त्यांच्या डोळयातून आश्रू निघत तर होतेच पण ते आश्रू रक्ताने माखलेले होते. कारण जनावर मुकं असलं तरी त्यांची मालकावरची असलेली माया, प्रेम त्या ठिकाणी दिसून येत होतं. गणपत काही आता परत येणार नव्हता. काही वेळातच ही खबर गावात पोहोचली. कारभरणीला कळताच तिच्या पोटात गोळा आला, डोळयातंल पाणी पळालं, काय करावं सुचेना, कोणाला हाक मारावी कळेना, सैरा वैरा पळत ती रानाच्या दिशेनं पळू लागली. गावातील लोकं ही तिच्या मागं पळत होती. तिनं आपला कारभारी झाडाला लटकलेला पाहून तिने हंबरडा फोडला. वीस फुटावरच तिनं स्वत:ला जमीनीवर टाकून दिलं. तिला सर्व प्रकार दिसत होता मात्र हतबल झालेली कारभारीन जीवंत होती पण हालचाल करत नव्हती. पोरगं माय रडते म्हणून रडू लागलं. त्याला कळत नव्हतं आपला बाप झाडाला का लटकलाय, त्याच्या काही प्रकार लक्षातच येईना. गावतील काही गावकऱ्यांनी पोलीसांना फोन केला सर्व काही झालं. अंत्ययात्रा निघाली. जनावरं, कारभारीन, पोरगं समदं गाव रडू लागलं. साऱ्या गावात त्या दिवशी कोणी जेवलं नाही. उपासपोटी दिवस काढला. असं दु:ख कुणाल्या वाटयाला येऊ नये. जाणारे जातात पण आपल्या पुढील आयुष्यात आपल्या कुटूंबाचं काय होणार याचाही विचार करायला हवा. कारण कोणीच कोणाचं नसतं हे सर्वांना माहिती असून सुध्दा तुटपुंजा मिळणऱ्या मदतीपाई आपला लाखमोलाचा जीव नका गमवू. माझ्या शेतकरी बांधवांनो आम्हाला गरज आहे तुमची , हिम्मत हारू नका. कृषीप्रधान देशात लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे, जगलाच पाहिजे, जगलाच पाहिजे. ……
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment