कोरोना एक विदारक वास्तव …

 
कोरोना एक विदारक वास्तव …

माणूस आयुष्यभर मी पणामध्ये जगतो. पण आजच्या घडीला कोरोनामुळे त्याच्या वाटयाला आता शेवटची अंघोळ सुध्दा नशिबात नाही, शेवटची मिरवणूक नाही, तिरडी नाही, सोबत नातेवाईक नाहीत, नातेवाईकच काय तर स्वत:च्या घरातील सदस्य देखील सोबत नाहीत, एकुणच काय तर मरणाचा सोहळा अंत्यसंस्कार आता कोणालाच साजरा करता येणार नाहीत. मृत्यूनंतर लगेच प्लास्टीक पॅकींग आणि प्रेत सरळ स्मशानभुमीत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार सुध्दा आता विधीप्रमाणे होत नाहीत, कारण तेवढा वेळच कुणाकडे नाही एवढी मृत्यूची संख्या वाढत आहे. हे वास्तव आहे. मृत्यूची वेळ आणि काळ खरंच खूप बदलला आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रेतं जाळण्यासाठी आता लाकडं सुध्दा कमी पडत आहेत. शासकीय यंत्रणेमार्फत प्रेतांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेस मृत्यूसंख्या वाढत असल्यामुळे विलंब लागत आहे.  प्रेतं जाळण्यासाठी भली मोठी रांग लागलेली दृश्यं उघडया डोळयांनी पहावे लागत आहेत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे शिवाय अलीकडे तर त्याहूनही अधिक विदारक वास्तव चित्र पहावयास मिळालं की, नदीपात्राच्या पाण्यामध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची प्रेतं फेकून दिली गेली. असलं कसलं दुर्देव असेल मानवी जीवनातलं. एवढी आपल्यातली माणुसकी संपली ? हातात स्मार्टफोन आल्यापासून आपण इकडे तर व्हॉट्सॲप आणि फेसबुक विद्यापीठामध्ये दिवसाच्या सुरुवातीपासून रात्री झोपेर्यंत प्रत्येकजण एकमेकांना सुविचार, प्रेरणादायी विचारांचा प्रसाद वाटत सुटतो आणि या देशामध्ये प्रेतं नदीपात्रात बेवारसपणे कशी काय फेकून दिली जाऊ शकतात. हा अत्यंत निंदनिय प्रकार आहे. माणूस एवढा कसा काय निर्दयी होऊ शकतो ? देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनासारख्या महामारीमुळे कित्येक निष्पापांचे बळी गेले आहेत व अजूनही जात आहेत. दिवसागणीक कित्येकांचे जीव या कोरोनामुळे गेले. याचे अजूनही गांभिर्य कोणाला आहे असं एकंदरीत सध्यातरी वाटत नाही. मला काहीच होत नाही अशा विचारसरणीची असणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. अजूनही रस्त्यावर पोलीसांच्या काठयांचा दणका अनेकांना बसतोय. तरी सुध्दा अनेक मोकाट मनुष्यप्राणी मास्क न लावता व निर्बंध लावलेल्या ठिकाणीच मुदृदाम बिनधास्त फिरत आहेत. यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अशाच लोकांच्या वागणुकीमुळे कोरोना बळावतोय. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे जोडायची नाही हे मुख्यत्वे लक्षात असू द्या. जोपर्यंत कोरानाची साखळी तुटनार नाही आणि कोराना हद्दपार होणार नाही तोवर आपल्याला आणखी घरातच बसावे लागणार आहे. ज्याला हा आजार होऊन गेला त्याची प्रत्यक्ष भेट घ्या व त्यास कोरोनामुळे होणऱ्या त्रासाबाबत त्याचा अनुभव विचारा की, कोरोनाचे काय दुष्परीणाम आहेत. ज्याच्या घरातील व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले आहे त्याच्या परिवाराची एकदा भेट तर घेऊन पहा म्हणजे कळेल तुम्हाला की, कोरोना खरंच काय आहे.

आज बघता बघता दुसरं वर्षही अर्ध्याहून पुढे सरलं आहे. रस्त्यावर विनाकारण गर्दी करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असंच जर सुरु राहिलं आणि ही गर्दी थांबलीच नाही तर हे ही वर्ष या कोरोना काळात बघता बघता असंच निघुन जाईल आणि यापुढेही विदारक परिस्थती निर्माण होईल व अत्यंत वाईट वेळ आपणावर येईल हे मात्र निश्चित.

इथं तरुणांच्या हाताला कामं नाहीत, तरुणाई रोजगार हवाय म्हणून टाहो फोडत आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. सर्वांचच आर्थिक गणित कोलमडून गेलं आहे.  कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. देशाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. अनेक तत्वाज्ञांनी याविषयी आपापली मतंही मांडली आहेत. त्यांच्या मते आपल्या देशाची आर्थिक स्थिती जवळपास तीस वर्षे मागे गेली आहे. याविषयी जनसामान्यांमधून सुध्दा नाराजीचा सूर निघत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता व तयारी असायला हवी व त्या घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी शंभर टक्के झाली पाहिजे. ज्यांच्यावर जनतेच्या सेवेची जबाबदारी आहे त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करुन त्यावर तात्काळ तोडगा काढला पाहिजे. स्वार्थापायी अयोग्य निर्णय घेतले तर संपूर्ण देशावर मोठे संकट ओढावेल. वेळोवेळी हिताचे निर्णय घ्यायला हवे व त्यावर उपाययोजना आखायला हव्यात.  तरच आपण सारे कोरोनासारख्या आजारावर मात करु शकू.

आणखी किती दिवस घरामध्ये बसावे लागणार आहे, कोरोना आजारावर औषण कधी निघाणार आहे, कोरोना कंधी संपेल या सर्व प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीत व याची उकल कोणही करु शकनार नाही. हा व्हायरस आणखी किती निष्पापांचे बळी घेणार आहे याचा अंदाज सध्यातरी कोणालाच लागणे शक्य नाही, त्यामुळे जेवढं जमेल तेवढी काळजी घेणे आपल्या हातात आहे. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकानं आपली व आपल्या परिवाराची तसेच स्वत:ची काळीजी घ्यावी व कोरोना आजाराबाबत जनजागृती करणे हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.

भविष्य सुखकर करायचं असेल तर आत्ताच काही गोष्टींना मर्यादा घालाव्या लागतील. अन्यथा अनर्थ झालाच म्हणून समजा. ज्या परिवारावर कोरोनाचे संकट ओढावले आहे त्या परिवाराला तुमच्या मदतीची तसेच हातभाराची गरज आहे असे गृहीत धरुन त्यांना तुम्ही जमेल तेवढा हातभार लावा व जेवढं जमेल तेंवढा मानसिक व आर्थिक आधार द्या. कारण, माणूसच माणसाचं दु:ख समजू शकतो. ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. लक्षात ठेवा यापुढेही अनेक संकटं या जगावर येणार आहेत त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात सक्षम राहणं हे खुप महत्वाचं आहे. त्यामुळं आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला पाहिजे. दानशूरांना एकच विनंती आहे की, भविष्यात तुम्हाला दान द्यायचं असेल तर सर्वसोयींयुक्त मोफत दवाखाने व शाळा बनवण्यासाठी द्या. त्यामुळं आरोग्य क्षेत्र सक्षम होईल व सर्वांना शिक्षण मोफत मिळेल.


कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अनेक रुग्णालयांमध्ये बेड मुळीच शिल्लक नाहीत, लसीचा तुटवडा आहे, ऑक्सीजनचाही मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे, जगातील अनेक देश एकमेंकांना मोठया प्रमाणात होताहोईल तेवढी मदत करत आहेत. त्यामुळं पुढील काळात जगायचं असेल तर या आजारावर विजय मिळवून ही लढाई सर्वांना जिंकायची आहे. बघता बघता जवळची माणसं आपल्यातून कायमचं निघून जात आहेत. याचं फार मोठं दु:खं सर्वांना आहे व हे दु:खं पाठीवर घेऊन मोठया हिंमतीनं हा पल्ला आपल्या सर्वांना पार करायचा आहे. तसेच आपल्या घरातील वयोवृध्दांची काळजी घ्यायची आहे. अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांची तसेच नातेवाईकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे म्हणून या कठीण काळात सर्वांनी तडजोड करुन उपचार घ्यावेत व आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. काही रुग्णालयात तर अनेक वॉर्डमध्ये मृत व्यक्तींसोबत कित्येक रात्री रुग्णांना भीत भीत काढाव्या लागत आहेत असं हे कोरोना महामारीमुळं निर्माण झालेलं विदारक वास्तव आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रशासनाला, डॉक्टरांना व आपल्यासाठी रस्त्यावर चोवीस तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार करायचं आहे. मोठया प्रमाणात होणारी गर्दी टाळायची आहे. आत्ता जर ही गर्दी टाळली तर आपले व आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुखकर होणार आहे. त्यामुळं एकमेकांना मानसिक आधार द्या, भितीचं वातावरण निर्माण होईल अशा माहितीचा प्रसार व प्रचार चुकूनही कोणी करु नका, प्रत्येकाला कोरोनामुक्त होण्यासाठी सकारात्मक उर्जेची मोठया प्रमाणात आवश्यकता असते त्यामुळे कोरोनाबाधीतास मानसिक आधार द्या. कोरोना आजार बरा होतो, मृत्यूच्या प्रमाणात कोरोना आजारावर मात केलेल्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे, त्यामुळं जास्त भिती बाळगण्याची काहीही आवश्यकता नाही.

अनेक ठिकाणी मेडीकल स्टोअर्स, पॅथॅलॉजी लॅब, खाजगी दवाखाने व इतर व्यापारी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा दाखवुन अडवणुक करुन आर्थिक लुट करणारे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशी कृत्यं करणारांवर पोलीस प्रशासनाने लक्ष ठेऊन त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई केली पाहिजे जेणे करुन जनतेची आर्थिक लुट थांबेल. सकारात्मकता ठेवा कोरोनावर नक्कीच विजय मिळेल. देशातून नव्हे तर जगातून कोरोनाला पळवून लावता येईल असे प्रत्येकांनं वागा व प्रशासनाला सहकार्य करा कारण ते आपल्यासाठीच सेवेत रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. आपलं कुटूंब सुरक्षित ठेवा म्हणजे ही सर्वात मोठी राष्ट्रसेवा ठरणार आहे. कोरोना टाळण्यासाठी काही काळ घरातच रहा व सुरक्षित रहा.

-     शंकर शेषेराव चव्हाण, महाराष्ट्र राज्य.

Motivational Speaker |  Writer | Blogger | Poet | Information Technology Analyst




Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..