अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …
अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …
सध्या देशाची मानसिक स्थिती अशी झाली आहे की, ट्रेंडच्या नावाखाली काहीही खपवलं जात आहे. काहीतरी नवीन कुरापती करायच्या व त्याला नवीन ट्रेंड आला म्हणून आपण साऱ्यांनी अशा बाबींना अगदी डोक्यावर घ्यायाचं. ट्रेंडींगच्या नावाखाली मग तो देशाचा, धर्माचा अपमान का असेना. देशप्रेम नाही, धर्मप्रेम नाही, आदर सन्मान नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायद्याचा धाक मुळीच नाही. ट्रेंडींच्या नावाखाली या ट्रेंडवाल्यांनी कायद्याच्या चौकटी मोडून त्याच्या शेकोट्या केंव्हाच केल्यात आणि शेकोटया करुन त्याची पार राखरांगोळी झाली हे मात्र अद्याप कोणाच्याही लक्षात आलंच नाही. अलीकडेच एका बारावीत शिकत असलेल्या शेंबडया पोरानं एका समवयस्क पोराला साऊथच्या सिनेमाच्या सिनप्रमाणे धारदार कोयत्याने भोसकले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हे सगळे त्या ट्रेंडींग रिलचे व साऊथच्या सिनेमांमधील विकृत दृष्यांचे दुष्परीणाम आहेत यात शंक्काच नाही. ट्रेंडच्या नावाखाली काही महिला व मुलींनी रिल तयार करुन त्यावर अश्लिल वर्तन करुन व्हीडीओ तयार करुन साेशल मिडीयावर त्याचा प्रसार करतात. कुठेही कशाही प्रकारचे अश्लिल व घाणेरडे विनोद ट्रेंडच्या नावाखाली तरुण पिढीवर बिंबवले जात आहेत. आधीच कोरोनाचे सावट त्यात शाळा बंद, ऑनलाईन शिक्षणामुळं शिक्षणाची गुणवत्ता शाळेत शिकवतात तेवढी शाश्वत राहीली नाही त्यामुळं अख्खी पिढी बरबाद झाली असं म्हटलं तर वावगं ठरु नये. आईच्या हातातला मोबाईल सुटेना अन् बापाच्या हातातला दारुचा ग्लास, त्यामुळं आजची पिढी काय करते याकडं माय बापाचं मुळीच लक्ष नाही. मुलं शिकायला इंग्रजी शाळेत घातली. आपली पोरं चांगल्या शाळेत शिकावीत अशी प्रत्येक पालकाची मानसिक तुर्मट असते. असावी, पण आपण आपल्या पाल्याला शाळेत पाठवल्यानंतर त्याच्याकडं लक्ष कोण देणार? त्याला जीवनातील सकारात्मक वाटेवर चालण्यासाठी दिशा कोण देणार ? एवढं साधं कळत नाही. मुलं अगदी बालवयात असतांना घराध्ये जर अशा प्रकारचं वातावरण असेल तर कशी चांगली पिढी घडणार. चित्रपटांमध्ये काय दाखवावं काय नाही, विनोदाच्या नावाखाली अश्लिल विनोद तरुणांच्या डोक्यात कोंबले जाततात. विनोद असावा पण त्यालाही काही मर्यादा असाव्यात.
सध्या ट्रेंडच्या नावाखाली सोशल मिडीयावर रिल बनवल्या जात आहेत, त्यात प्रँक, अश्लिल हावभाव, अंगप्रदर्शन. प्रसारमाध्यम मंत्रालयांमार्फत अशा गोष्टींवर बंदी आली तर देशतील नव्वद टक्के लोक कामं करतील. सरकारी कार्यालयातील शिपायांपसून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळयांच्या मोबाईलमध्ये या ट्रेंडीग रिलचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. जरा मोकळा वेळ मिळाला की, घातलं डोकं मोबाईमध्ये. यातून कोणीही सुटलेलं नाही. त्यात आपला किती अमुल्य वेळ वाया गेला हे त्याचं त्याला पण कळेनासं झालं आहे. काही देशांमध्ये इंटरनेटचा फक्त कामकाजासाठी वापर होतो, पण आपल्या देशात कामकाजासाठी कमी व टाईमपाससाठी जास्त इंटरनेटचा वापर केला जातो.
आता जवळ जवळ बॉलीवुडचं साम्राज्य संपलंच म्हणावं लागेल. टीव्ही चॅनलवर आता साऊथच्या सिंनेमांनी गर्दी केली असून ते आपली हुकुमत गाजवत आहेत. अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये फक्त दादागिरी, कोयते घेऊन कापाकापी, खून खराबे असे जोरदार सिन चालू असतात. चित्रपट बनवल्यानंतर त्याला मान्यता देण्याचं काम सेन्सॉर बोर्डाचं असतं. मुळात अशा विकृत प्रकारचे चित्रपट बनवल्यानंतर त्याला मान्यता न देण्याची मोहीम जर सेन्सॉर बोर्डानं हाती घेतली तर देशातील किमान पन्नास टक्के गुन्हे त्वरीत कमी होतील सुध्दा. प्रसारमाध्यमांनी जर सकारात्मक गोष्टींचा प्रसार व प्रचार करण्यासाठी प्राधान्य दिले तर देशहितासाठी ही नक्कीच फायदेशिर बाब आहे. अशा विकृत प्रकारचे सिनेमे पाहून तरुणाईच्या अंगातील रक्त सळसळ करु लागले आहे. तशा प्रकारच्या स्टाईल, म्हणजेच अनुकरण आत्ताची पिढी करत आहे. गल्लोगल्ली अशा प्रकारचे गुंडगिरी करणारी टोळी तयार होत आहे. “ये अपुन का इलाका है, अपुन इधर का शेर है. इधर आने का नै. नै तो तेरेको काट डालेगा, टपकाईच डालेगा तेरेको” वगैरे वगैरे. अशा प्रकारचे वाक्य अल्पवयीन मुलं बोलायला लागले आहेत. अरे बाबा आधी तु चांगलं काही तरी करुन दाखव व चांगले विचार कर, चांगलं बोलायला शिक असं जर त्याला म्हटलं तर तो चावक्या कुत्र्यासाखा अंगावर नाही का येणार. मित्रांनो हा विनोद नाही. अशा प्रकारच्या वागणुकीला हयांचे नालायक मायबापच जबाबदार आहेत. यांच्या लाडामुळेच पोरं पोरी पार बिघडुन गेली. त्यांना वडीलधारी माणसं समजत नाहीत, आरेतुरे, अरेरावी, आचरट शिव्या, अश्लिच विनोद, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, नशा पाणी करणे, अवैध गोष्टी करणे हीच यांची दुनिया असा सारा एकूणच मेळ झाला आहे व अशा प्रकारच्या वातावरणातुन गुन्हेगार तयार होतात. जन्मता कोणीही गुन्हेगार नसतो. मात्र अशा प्रकारचे पोषक वातावरण युवकयुवतींना गुन्हेगार तयार करण्यास पुरेसं असतं. त्यासाठी चांगले वातावरण व चांगली संगत या दोन बाबी जीवनामध्ये खुप महत्वाच्या भूमिका बजावतात. पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी परगावी शहरात ठेवतात. मागेल तेवढा पैसा देतात, गाडी देतात, मोबाईल तर जीवनावश्यक बाब, त्यात त्याला नको नको ते लाड पुरवले जातात, त्यामुळं परिस्थितीची त्याला ना जाणीव रहाते ना किंमत. हा आपला बीडया फुकतो, शिगरेटं पितो, हुक्का, दारु, बियर, कॉकटेल करत फिल्मी स्टाईल मारत बसतो. वाटेल तसं मुलं व मुली वगतात यात शंक्काच नाही. तासनतास मुली व मुलं अभ्यास सोडून फोनवर बोलतात व अशा प्रकारे बोलत बोलत ‘टाईमपास’ करत ‘सैराट’ होऊन जातात. त्यानंतर पालकांना प्रश्चाताप होतो. नंतर प्रश्चाताप करुन घेऊन त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आधीच आपल्या मुलामुलींचा लाड मर्यादीत करा, त्यांनाही परिस्थितीची जाणीव असू द्या. एखादया दिवशी पायी चालत शाळेत पाठवा. गरीबांची मुलं शाळेत कॉलेजात पायी कशी चालत जातात तुमच्या मुलांना पण कळू दया त्याची किंमत. मुळात अशा गोष्टींमध्ये एक वेगळाच आनंद असतो. पण आपण आनंद, सुख नको त्या गोष्टींमध्ये शोधत बसतो. जीवन एवढं सुंदर असतांना आपण पैशानं सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतो मात्र सुख हे पैशांन कधीच विकत घेतलं जाऊ शकत नाही हे जगाच्या पाठीवरचं सत्य आहे. त्यामुळं पालकांनो आपली लेकरं सांभाळा, त्यांच्यावर चांगले संस्कार करा. नाही तर उदया तुमचाही गळा कापायला मागं पुढं पाहणार नाही तुमचा बाळया आणि तुमची परी लक्षात असू दया.
घरामध्ये संत, महापुरुषांचे विचार पेरा, कारण तुम्ही तुमच्या घरात जे पेराल तेच पुढच्या पिढीच्या रुपाने उगवणारं नवं पिक आहे. त्यामुळं अगोदर स्वत:चं वैचारिक व मानसिक आरोग्य सांभाळा व आपल्या लेकरांना त्याचं योग्य स्वास्थ्य लाभू दया. खून करुन किंवा मारहाण करुन कोणाचंही भलं झालं नाही. कमी वयात अशा प्रकारचे गुन्हेगार तयार झाले तर देशाचे भवितव्य धोक्यात आहे असं समजावं. ट्रेंडीगच्या नावाखाली आपल्या मुलामुलींच्या राहणीमानावरही लक्ष असु द्या. मुलींनी फॅशन करावी पण अंगभर कपडे घालून. मुलीच्या आईची ही जबाबदारी आहे आपल्या मुलीला कशी घडवायची. मुलींना स्वरक्षणासाठी कराटे, तायक्वांदो अशा प्रकारच्या रक्षणविद्या शिकवाव्यात. जेणेकरुन घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या नादी कोणी लागणार नाही व तसं कोणी केलंच तर त्यापासून बचाव करण्याइतकी तरी किमान हिंम्मत यामुळे तीला मिळेल.
सर्वच मुलं मुली वाईट असतात किंवा अशा प्रवृत्तीची असतात असं नाही पण ट्रेंडीच्या व संगतीमुळे परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही हेही लक्षात असू दया. जीवनात नाव कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजावं लागतं पण नाव गमवण्यासाठी एक मिनीट पुरेसा असतो. त्यामुळं गोष्ट हाताबाहेर जाण्याअगोदर वेळीच सावध होऊन जपून पाऊल टाकलं पाहिजे. सध्याची पिढी कशी घडवायची ही संपूर्ण जबाबदारी आई वडीलांवरच आहे. शरीरावर झालेल्या जखमा दुरुस्त होतात पण बालमनावर नियतीविरुध्द बिंबवलेल्या जखमा कधीच दुरुस्त होऊ शकत नाहीत. त्यामुळं त्या पोराच्या बापाला त्याच्या स्टाईलनेच आज उत्तर दिलंय, “अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय” ...
ईमेल : hr.shankarchavan@gmail.com
भ्रमणध्वनी क्रमांक : 9921042422
Comments
Post a Comment