फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा …

फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा …



समाजामध्ये चांगल्या गोष्टी खूप काही आहेत, पण त्या हल्ली अदृश्य होत चालल्या आहेत. एकूणच काय तर प्रत्येक व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन हा एकमेकांविषयी बदलत चाललेला आहे. असे आढळून आले.  यामध्ये बदल घडवायचा तरी कसा ? हा मोठा यक्ष प्रश्न. यावर उपयोजना ही स्वतःच करावी लागेल. समाजामध्ये काम करत असतांना लोक काय म्हणतील ? या तीन शब्दामुळे हिम्मत असून सुध्दा पुढचं पाऊल उचलायला अनेकजण घाबरतात. व त्याची प्रगती तिथेच खुंटते. प्रत्येकाने जीवन जगताना दृष्टीकोन बदलला पाहिजे. ज्या क्षणाला आपण आपला दृष्टिकोन बदलू त्या क्षणापासून आपला व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदललेला असेल. प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक असतो, फक्त त्याचे विचार प्रामाणिक असायला हवे. प्रत्येक व्यक्ती हा बुद्धिमान असतो, पण त्याच्या अप्रामाणिक विचारशक्ती मुळे तो त्याच्या बुद्धीचा आवश्यक तेवढा वापर करत नाही. म्हणजे तो त्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलायला तयार नसतो, त्यामुळे तो माणूस वाईट आहे असा समज समाजामध्ये होतो. ज्या क्षणाला त्या व्यक्तीने त्याचा दृष्टिकोन बदलला व विचार प्रामाणिक करायला सुरुवात केली, त्याच क्षणाला तो व्यक्ती आपोआप चांगला होतो. म्हणजे दृष्टिकोन बदलाचे एवढे मोठे फायदे आहेत. आपल्या सोबत एखादा व्यक्ती प्रामाणिक राहून आपली आयुष्यभर साथ देत असेल तर त्या व्यक्तीला आपणही प्रामाणिक राहून आयुष्यभर साथ दिली पाहिजे. ज्याप्रमाणे आपली सावली आपली साथ कधीच सोडत नाही त्याप्रमाणे आपणही त्या व्यक्तीच्या सुखदुःखांमध्ये साथ सोडली नाही पाहिजे. एवढं साधं गणित ज्याला कळलं तो आयुष्याच्या यशाच्या अगदी शिखरा जवळ आहे असं समजावं. इतरांबद्दल फुलांप्रमाणे दृष्टिकोन असावा. जसं की, फुल जात ,धर्म, लिंग, अशा प्रकारचे मतभेद न करता प्रत्येक व्यक्तीला आपला सुगंध देतो व प्रसन्न करतो. हा त्याचा प्रामाणिक गुणधर्म तसेच प्रामाणिक दृष्टीकोन आहे.  तसेच नुसतं माणूस म्हणून जगणं महत्त्वाचं नाही एक व्यक्तिमत्त्व म्हणून जगणं हे जास्त महत्वाच आहे. कारण, व्यक्तीचे शरीर हे नाशवंत आहे परंतू त्याचं व्यक्तिमत्व कायम जिवंत राहणार. म्हणूनच प्रत्येकाने विचार प्रामाणिक करावा व प्रामाणिकपणाचा दृष्टीकोन अवलंबावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साऱ्या जगाला संदेश देऊन गेले. देव देवळात नाही तर तो माणसात शोधावा. देवळात देव शोधत बसण्यापेक्षा आपण आपला दृष्टिकोन बदलला व माणसात देव शोधायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला माणसांमध्ये देव भेटल्याशिवाय राहणार नाही. स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतः जगायचं विसरून गेलाय, तो काम करतो दिवसभर, पैसे कमावतो, ते स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी. तो स्वतःचं जगणं या गर्दीमध्ये विसरून गेला आहे. स्वतःला वेळ देणं हा तो विसरून गेला आहे, स्वतःच्या आरोग्याकडे व स्वतःच्या शरीरावर प्रेम करणं तो विसरून गेला आहे, त्याने त्याचा दृष्टिकोन बदलला व स्वतःवर प्रेम करणे, स्वतःला वेळ देणे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे या गोष्टींचा अवलंब केल्यास त्याचे जीवनमान नक्कीच सुधारु शकते. हल्ली माणूस हा जातीच्या चौकटीत अडकलाय. तो जातीजातीमध्ये विभागला गेला असल्यामुळे प्रत्येक जातीला एका रंगामध्ये बंदिस्त केले आहे. त्यामुळे लिंग, धर्म, जात या मतभेदामुळे माणूसच माणसाचा शत्रू बनला आहे. हे म्हणजे त्याने त्याचा दृष्टिकोन नकारात्मक करून ठेवला आहे. ज्यादिवशी हाच दृष्टिकोन सकारात्मक होईल त्या दिवशी संपूर्ण सजीव सृष्टी मध्ये सुख आणि समाधान पहावयास मिळेल. माणसाने एक दिवस स्वतःसाठी जगलं पाहिजे कारण एक उनाड दिवस जगल्याने आयुष्य पाच वर्षांनी वाढतं असं म्हणतात. त्यामुळे या मोबाईल युगामध्ये एक दिवस स्वतःसाठी द्या. आपला दृष्टिकोन बदला व समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिक पणे इतरांना मदत करा. जात, धर्म, लिंग, वैचारिकम मतभेद सर्व विसरून माणूस म्हणून जगायला शिका. इतरांशी बोलत असताना नेहमी विचार करून बोला, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायचला शिका व त्यांच्या आज्ञेचे पालन करा. या गोष्टींमध्ये जे समाधान आहे ते या विश्वामध्ये आपल्याला कुठेही मिळणार नाही. स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपणही स्पर्धक म्हणून सहभागी व्हावं लागतं. कारण, त्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. परंतु काहीवेळेस स्पर्धा करत असताना स्पर्धा कोणती आहे, याचाही विचार करायला हवा. एखाद्या गोष्टीची स्पर्धा करत असताना स्वतःचे नुकसान तर होत नाही ना, याचाही विचार करायला हवा. कारण प्रत्येक स्पर्धा ही जिंकता येईल असं नाही. प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतो, पण ज्याचा दृष्टीकोन प्रामाणिक त्याची सुख वाट पाहत असते असे, कित्येक प्रबोधनकार आपल्याला सांगून गेले. तरीही आपण चुकीच्या मार्गाने जातो व सुख मिळवण्यासाठी शॉर्टकट पद्धतीचा अवलंब करतो. परिवर्तन ही काळाची गरज आहे, काळानुसार प्रत्येकाने बदलले पाहिजे पण एवढंही बदलायला नको की, त्याचा अतिरेक होईल. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच गोष्टींमध्ये बदल असावा. ज्या गोष्टींमध्ये बदल नको आहे त्या गोष्टीमध्ये बदल न केलेला केव्हाही चांगला. परंतु आपण आजूबाजूच्या व्यक्तींसोबत नको ती स्पर्धा करायला जाऊन स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो. अशी वृत्ती असणारे यशाची शिखरे गाठण्यास असमर्थ ठरतात. कोणताच मार्ग हा चुकीचा नसतो चुकीचा असतो तो आपला दृष्टिकोन. ज्यावेळेस आपला दृष्टिकोन सकारात्मक करु तेव्हा तो मार्गही बरोबर दिसेल. एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत तेव्हा बनवा जेव्हा आपण त्याच्याबद्दल स्वतःच्या कानांनी ऐकू व स्वतःच्या डोळ्यांनी त्याच्याबद्दल पाहू. तेव्हाच त्या व्यक्तीबद्दल आपलं मत ठरवू अन्यथा सत्य कदाचित आश्चर्यकारक असू शकते.  विश्वास त्याच गोष्टीवर तेव्हा ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहिल्या व कानांनी ऐकल्या. म्हणूनच जीवनामध्ये प्रामाणिक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे यशाला गवसणी घालने होय. जीवनामध्ये आपला दृष्टिकोन बदला व जीवन अधिकच सुंदर बनवा. आपला स्नेही किंवा आपला जोडीदार त्याच्यामध्ये काही चांगली वाईट गुण असतील तर त्या व्यक्तीला गुणदोषासह स्वीकारणे हा आपला माणूस धर्म आहे. त्यामुळे आयुष्याच्या वाटचालीत आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व व्यक्तींसोबत आदराने वागले पाहिजे. नेहमी मी ऐवजी आपण असा शब्दप्रयोग केला तर निश्चितच एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होऊन नाती घट्ट होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणजे आपण दृष्टिकोन बदलतोय असं आपल्याला वाटेल. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जागा करण्यासाठी अगोदर स्वतः स्वतःला ओळखायला शिका. आपण कोण आहोत, आपण काय करतोय, आपली ताकद ओळखा व आपल्याला सोयीनुसार जे जे कामं करता येतील ती ती कामं जास्तीत जास्त केली पाहिजे कारण जेवढया जास्त क्षेत्रांमध्ये आपण कार्यरत राहू, तेवढा जास्त अनुभव आपल्याला मिळतो. अनुभव ही सर्वात मोठी आयुष्याची शिदोरी आहे. नेहमीच तुम्ही सत्याच्या बाजूने चाललात व इतरांविषयी चांगला दृष्टिकोन ठेवला तर येणाऱ्या काळात तुम्ही स्वतःवर व संपूर्ण जगावर विजय मिळवलेला असेल. म्हणूनच नकारात्मक गोष्टी आजच सोडून द्या व सकारात्मक गोष्टींचा अवलंब करून तसा दृष्टिकोन ठेवा यश तुमच्याच हातात आहे.
- शंकर चव्हाण, अंबाजोगाई,  9921042422
Email : hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..