मोर्चे इथले संपत नाहीत ...
मोर्चे इथले संपत नाहीत
भारत देशामध्ये न्याय व हक्कासाठी मोठ्या प्रमाणात
मोर्चे काढले जातात, समाजातील वंचित घटक आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मोर्चे
काढतात, शेतकरी त्यांच्या न्याय व हक्कासाठी मोर्चे काढतात, विद्यार्थी त्यांच्या न्याय
व हक्कासाठी व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढतात, समाजातील विविध धर्मातील
विविध जाती आरक्षणासाठी मोर्चे काढतात, शहराला पाणी मिळालं नाही म्हणून मोर्चे काढले
जातात, वीज वेळेवर मिळत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य
वाढलं म्हणून मोर्चे काढले जातात, राज्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून मोर्चे
काढले जातात, अमानुषपणे बलात्कार होतात तेव्हा मोर्चे काढले जातात, डॉक्टर संप करतात,
संविधान जाळले जाते म्हणून मोर्चे काढले जातात, भारत माता की जय कुणी म्हणत नाही म्हणून
मोर्चे काढले जातात, सोशल मीडियावर एखादया महापुरूषाची बदनामी होते म्हणून मोर्चे काढले
जातात,तिरंगा जाळला जातो म्हणून मोर्चे काढले जातात. देशांमध्ये अशा अनेक समस्या आहेत की त्यासाठी आंदोलनं,
मोर्चे, उपोषणं करावी लागतात. सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या मनामध्ये जनतेबद्दल
सहानुभूती राहिली नाही. देशातील सुजाण नागरिकांना होणारा त्रास जर या देशातील सुजाण
नागरिक असलेले पण शासकीय सेवेत व जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी
सत्ताधारी म्हणून सत्तेत असलेले मंत्री व विविध स्तरावर मोठ्या हुद्द्यावर बसलेले अधिकारी
यांनी अशा प्रकारच्या गंभीर समस्या वेळीच विचार केला तर देश प्रगतीपथावर नक्कीच जाईल.
भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहात आहे, पण या देशातले आंदोलनं, मोर्चे, उपोषणं,
निवेदनं ही काही संपायला तयार नाहीत. एवढे सर्व होऊनही यामध्ये कित्येक जणांचे बळी
गेले आहेत. मोर्चेकऱ्यांवर लाठीमार होतो, अलीकडील काळात शेतकऱ्यांनी दिल्ली येथे मोर्चा
काढला होता. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी, त्यांच्या न्याय व हक्कासाठी त्यांचा
लढा सुरू होता. परंतु, त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यामध्ये काही शेतकरी जखमी झाले.
मात्र राज्यातील व देशातील शेतकरी प्रेमी नेते, तसेच शेतकऱ्यांच्या नावाने पक्ष, संघटना,
संघ काढून आपली दुकानदारी चालवणारे पांढऱ्या दाढया वाढवून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा
आव आणणारे, स्वयंघोषीत शेतकरी नेते यांच्या मुखातून शेतकऱ्यांविषयी या प्रकरणाबद्दल
कसलीही दया दिसली नाही किंवा तसे न दाखवता कुठेही त्याचा निषेध व्यक्त झाला नाही व
तशा प्रकारचे पाऊल उचललेही गेले नाही. याचे जास्त दुःख होते व खंतही तेवढीच वाटते.
आज ज्यांच्या प्रश्नाचे भांडवल करुन राजकारण केले जाते आज तोच कित्येक रात्री उपाशी
काढतो. शेतमध्ये जुगार खेळून कित्येक नुकसान सहन करतो याचा कोणी विचार करेल की नाही.
आज भारतामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांच्या
नावाने व कामगारांच्या नावाने अनेक संघटना, पक्ष, संघ यांच्या दुकानदाऱ्या अगदी जोमात
चालू आहेत. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील, संघटनेतील मुख्य पदाधिकाऱ्यांना शासन स्तरावरील
विविध ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा पदभार देऊन त्यांना नियुक्त केले आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांच्या बाजूने आजपर्यंत लढा देण्याचा सोंग घेणारे तेच शेतकरी नेते आता सत्ताधाऱ्यांनी
त्यांच्या कोपरा लावलेल्या गुळाचा अगदी डोळे झाकून अस्वाद घेत आहेत. त्यांना शेतकऱ्यांविषयी
प्रेम मुळीच राहिले नाही. शेतकरी मेला काय ? अन जगला काय ? याविषयी त्यांना काहीच देणंघेणं
नाही. असा खरा चेहरा त्यांचा आज समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सुद्धा धूर्त राजकारण्यांच्या
व धूर्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनाचे बळी होऊ नये एवढीच अपेक्षा. त्यांना वेळीच
त्यांची जागा दाखवली पाहिजे. प्रशासकीय स्तरावर
मोठ्या हुद्यावर बसलेले प्रशासकीय अधिकारी हे फक्त सांस्कृतिक कार्यक्रम, उद्घाटन प्रसंगी
प्रमुख पाहुणे म्हणून जाणे, कार्यालयात कधी कधी यायचं, तर कधी घरी बसूनच फाईलवर सहया
करायच्या. अशा प्रकारामुळे जनतेला त्यांच्या न्याय व हक्कासाठी उपोषणं, मोर्चे, आंदोलनं
करावे लागत आहेत, मोर्चे काढावे लागत आहेत. यामध्ये निर्दोष जनतेचे, विद्यार्थ्यांचे,
शेतकऱ्यांचे, महिलांचे बळी आजवर गेले आहेत. याचा विचार कुठेही होतांना दिसत नाही. त्यामुळे
या गोष्टीचे जास्त दुःख वाटते. भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले
जाते तर, ती गोष्ट आहे फक्त राजकारण. यामुळे देशातल्या बाकी समस्यांकडे कोणालाही ढुंकूनही
पाहायला वेळ नाही. त्यामुळे देशातील मोर्चे कधी संपणार याची भारत देशातील सुजाण नागरिक
वाट पाहत आहेत. मोर्चे काढणे, आंदोलनं करणे ही काही प्रशंसनीय किंवा चांगली बाब नाही.
उलट असे प्रकार घडत असल्यामुळे देश अधोगतीकडे जातोय, असा त्याचा अर्थ होतो. देशामध्ये
तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अशा प्रकारात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत
आहे. हा चिंतेचा विषय बनला असून यासाठी तोडगा काढणे शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे
आहे. येणाऱ्या काळात मोर्चांचे व आंदोलनाचे प्रमाण देशातले कमी व्हावे यासाठी सर्वांनीच
ठोस पावलं उचलायला हवी व अशा प्रकारच्या गंभीर समस्या सोडवायला हव्या तसेच देशाच्या
प्रगतीकडे कसा पोहचेल व देशातले मोर्चे, आंदोलनं, उपोषणं कमी करण्यास कशा प्रकारे मदत
करता येईल याकडे सकारात्मकतेने पाहिले गेले पाहिजे.
- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422
Email : hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment