अपघातावर बोलू काही !

अपघातावर बोलू काही !
सध्या जगणं अवघड व मरणं सोपं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, किड्या मुंग्यांसारखं माणसं मारायला लागली आहेत. जीवाची किंमत कवडीमोल होत चालली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, जणू जीवाची पर्वा कोणालाच नाही ! त्याचे महत्व काहीच शिल्लक नाही असे वाटायला लागले आहे. कारण आपण जीवाची किंमत वेळेला दिली आहे, आता माणसाच्या जीवापेक्षा, माणसाच्या शरीरापेक्षा वेळ अधिक मौल्यवान ठरत आहे. कित्येक उदाहरणं अशी आहेत की या वेळेपाई एखाद्या ठिकाणी वेळेत लवकर पोहोचण्याच्या नादात अनेकजण देवाघरी पोहचले, गतप्राण झाले. एवढी वेळ महत्वाची ? जीवाला काहीच किंमत नाही? टीव्ही लावला की अपघात झाल्याच्या बातम्या, पेपर उघडला की अपघात झाल्याच्या बातम्या, सोशल मीडियावर तर न पहावणारे, मन हेलकवणारे, काळजाचे ठोके वाढवणारे विचित्र अपघाताच्या फोटो, व्हिडिओ आपण पाहतो. जीव कासावीस होतो, निराश वाटते पण यावर उपाययोजना ? काहीच नाही ! वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसतसे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, किडा-मुंग्यासारखं  निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. देशामध्ये सर्वात जास्त अपघाताने मरण्याचे सत्र चालू असल्यामुळे अपघाताने मरणारांचे प्रमाणही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. अपघात टाळण्यासाठी जनसामान्यांमध्ये अधिक जनजागृती व्हायला हवी. तसेच प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय योजना करायला हव्यात, कारण हा अत्यंत गंभीर विषय आहे. अपघात हा विषय, जीवनमरणाचा प्रश्न, कलंक माणसाच्या जणू आयुष्याला चिकटूनच बसला आहे. त्यामुळे यावर लवकरच तोडगा निघायला पाहिजे नाहीतर निष्पापांचे बळी जाण्याचे हे सत्र चालूच राहणार. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, यावर प्रथम पायबंद घालायला पाहिजे. हेल्मेट सक्ती केली पण झालीच नाही ! याबाबत प्रशासन जनजागृती करायला कुठेतरी कमी पडले असं वाटतं. जनजागृती करत असताना, एखाद्या गोष्टीची सक्ती करत असतांना योग्य माध्यमांचा व योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास तो प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो. पण आजपर्यंत या बाबतीत उलटच घडत आले आहे. माणसाला स्वतःच्या जिवाची काळजी नाही व शासन सक्ती करतंय म्हणून हेल्मेट घेतलं जातं. सर सलामत तो पगडी पचास हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात रुजवायला पाहिजे, तरच स्वतःहून आपोआप हेल्मेट चा वापर नक्कीच वाढेल व स्वत:चे व निष्पापांचे प्राण वाचण्यास मदत होईल. अनेक घरं उध्वस्त होण्यापासून  वाचतील. अनेक अपघात हे रात्रीच्या सुमारास व पहाटेच्या सुमारास होतात, त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने वागले पाहिजे. अपघात टाळण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात प्रयत्न कसे करता येतील याचा विचार, अभ्यास केला पाहिजे. तरच अपघात रोखण्यात देशपातळीवर यश मिळेल, अन्यथा किडया मुंग्यांसारखे मरण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.  आपलं घरी कोणी वाट पाहतंय याचा विचार वाहनधाचाकांनी केला पाहिजे त्याची जाणीव जेव्हा होईल तेंव्हा  अपघात बऱ्याच प्रमाणात टळतील. वाहतुकीचे नियम सर्वांनी समजून घेतले पाहिजे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण स्वत:पासून घ्यायला पाहिजे, वाहतुकीचे नियम न पाळयामुळे सुध्दा मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे प्रमाण आहे यावर खरंच विचारविनिमय व्हायला पाहिजे. अपघाता वर बोलू काही हा विषय व या विषयावर कधी बोलण्याची वेळच यायला नको.
- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?