आक्रोश शेतकऱ्यांचा !
आक्रोश शेतकऱ्यांचा !
कुणाचं काय तर कुणाचं काय ? म्हणजे आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव असे मानले जाते. ते कितपत हे स्वत:च स्वत:ने ठरवावे. गेली कित्येक वर्षे जाती जाती मध्ये मतभेत तर आहेतच पण धर्मामध्ये सुध्दा मतभेद आहेत. आपापल्या धर्माचे पालन कसे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हल्ली या धर्मापरिसरामध्ये एक राजकारण चालू झाले आहे. कोणाला मंदीरामधील काकड आरती ची ऍलर्जी आहे म्हणजेच त्यामुळे झोप मोड होते असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे, तर कोणाला मशिदीमधील नमाजाच्यावेळी होणाऱ्या भोंग्याच्या त्रासामुळे झोप उडते असे बरेच जण व्यक्त होतात. असो, मला धर्मा विरोधात कोणतेही भाष्य करायचे नाही किंवा कोण्या धर्माविरोधात चांगली अथवा वाईट चर्चा करायची नाही. आपल्या देशामध्ये नको त्या गोष्टीला महत्वाचं स्थान देण्याची सवय असल्यामुळे असे प्रकार नेहमी घडतच असतात. पण शेतकऱ्यांचा आक्रोश अजुनही कोणाला जाणवला नाही, शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे कोणाची झोप उडाली नाही, त्यांच्या आक्रोशाचा आवाज आजपर्यंत कोणाला ऐकू आला नाही. असे का ? नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने कोण तरी उभा राहतो, मोठा माणूस होतो, बक्कळ पैसा कमावतो, नंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भाषण ठोकतो, "मी हयों करीन मी त्यों करीन", एखादा पक्ष काढतो, एखादी संघटना काढून रग्गड पैसा कामावतो व कुठंतरी गायब होतो, अथवा निवडणुकीच्या वेळी पेटया घेऊन गपगार होतो हा प्रत्येक शेतकऱ्यांच्या बाजूने मोठे झालेल्यांच्या स्टोऱ्या आहेत. शेतकऱ्यांची चिंता कोणाला नाही. हे आतला आवाज सांगतोय. शेतकरी कसा जगतो, जो कशा प्रकारे आपल्या कुटूंबाची उपजिवीका करतो याच्याशी कोणालाच काहीच देणं घेणं नाही. सावकाराच्या घशात गेलेली जमीन, त्याच्याकडून घेतलेले कर्ज, बँकाचे कर्ज, इतर कर्ज यासर्वांना कंटाळून तो आत्महत्या करतो मात्र त्याची दया, माया कोणालाच का बरं येत नसावी. त्याचंच खाऊन त्याच्याच सोबत अशा प्रकारची वर्तणुक कितपत योग्य, महत्वाचा सवाल एकच आहे की, बाबाहो, लाखोंचा पोशिंदा शेतकरी हा गरीब का असतो ? आणी तो ही आयुष्यभर ? सांगा आहे का याचं उत्तर कोणाकडे ? शेतकऱ्यांच्या विषयी लिहीणे म्हणजे शेतकऱ्यांबाबत किती सहवेदना, प्रेम आहे असा याचा अर्थ होत नाही. शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करुन आपली स्वत:चीच पोळी भाजून घेणारे बरेच पाहिलेत. बस करा रे, बस करा, हा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, महाराष्ट्र राज्यामध्ये किती तरी शेतकरऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्ष, संघटना, संघ स्थापन झाले परंतू एक धड ना भाराभर चिंध्या अशी गत या सर्व पक्ष व संघटनांची झालेली आपण उघडया डोळयांनी पाहातोय. पण या भोळया भाबडया शेतकरी बळीराजा करणार तरी काय आपल्या प्रश्नांना कोणी तरी उचलून धरतंय हे पाहून तो बिचारा आपली सर्व कामे टाकून मोर्चे, आंदोलनं, उपोषणं करण्यांसाठी जातो व म्होरके मात्र पेटया घेऊन मांडवली करुन मोकळे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कधी थांबणार ? जो तो येतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करुन मोठा होतो. कधी विचार केलाय का ? ज्या शेतकऱ्याने व शेतमजूराने आत्महत्या केली, त्याच्या घरचे काय हाल आहेत. एखादया लाखाचा चेक दिला म्हणजे झालं का ? त्याच्या कुटूंबाची आयुष्यभर काय हेळसांड होणार आहे याचा खरंच अभ्यास करायला हवा. कर्जाबाजारी, नापीकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतोय याचा आक्रोश कोणाला ऐकायला येणार आहे का नाही ? का मंदीरतील आवाज व मशिदीमधल्या भोंग्याच्या आवाजाने त्रास होतो व झोप उडते असे व्यक्त होता होता कधी राजकारणाला व धर्मा धर्मामध्ये भांडणे लावून देण्यासाठी सुरूवात होते हे कोणालाच कळत नाही. याचा सखोल विचार व्हायला हवाच. शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे म्हणणे कोणी तरी ऐकून घेण्यासाठी आता एखादया महापुरूषालाच जन्म घ्यावा लागेल याची वाट पाहातोय का आपण ? चला एक पाऊल शेतकऱ्याच्या कुटूंबासाठी व लाखोंच्या पोशिंदयासाठी, विचार करा, विचार आचरणात आणा, पोशिंदा जगलाच पाहिजे !
- शंकर चव्हाण अंबाजोगाई,
जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment