प्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच शेतकऱ्यांचा पुळका !

प्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच शेतकऱ्यांचा पुळका !


राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पार हाताबाहेर गेल्या असल्या तरी शासनाला काही जाग येईना. शेतकऱ्यांना फक्त मदत व कर्जमाफीचे आश्वासन दिले व घोषणा केली, मात्र थेट शेतकऱ्यांच्या पदरात शुन्य इतकी मदत मिळाली आहे. दहा हजार देऊ, कर्जमाफी करु, तत्वत: निकष इत्यादी सर्वांचा शेतकऱ्याला आत विट आला आहे. कधी शेतावरचा बांध न चढलेले, अर्धवटराव, स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे व शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून शेतकऱ्यांचा फक्त स्वप्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच पुळका असल्याचं सोंग करणारे, वर्तमानपत्राच्या व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिध्दी करत आहेत. खरंच यांना माहिती आहे का ? की, शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या घरची चुल कशी पेटत असेल, शेतकऱ्यांच्या भावना कधी समजून घेतल्या का? उगाच शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर लढा देत आहोत असे भासवून शेतकरी नेते म्हणवणारे ढोंगी पुढाऱ्यांनी आपली दुकाने व घरं मालामाल केली, पण शेतकऱ्यांच्या मालाला आजतागायत योग्य भाव मिळवून देऊ शकले नाहीत. हे नेते आपल्या महाराष्ट्राच्या मातीत ताठ मान ठेऊन जगू शकतात हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कशासाठी हव्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समित्या, कशाला हवा अभ्यास, पाचवीच्या लेकराला जाऊन विचारा शेतकऱ्यांच्या अवस्था, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या त्या माय माऊलीला विचारा जिचं कपाळ ओरडून ओरडून सांगेल बळीराजाच्या व्यथा, अरे नियतीला जाग येऊ दया ! बस्स करां रे असली ढोंगं ! गुरा ढोरांना शेतकऱ्यांच्या व शेतकमजुरांच्या व्यथा माहिती आहेत पण माणूस म्हणून जन्माला येऊन सोंग करणाऱ्यांना जाणीव असून सुध्दा त्याला बगल देत आपल्या स्वार्थापायी किती निष्पाप शेतकऱ्यांचे बळी घेऊन त्यांची कुटूंब उघडयावर आणणार आहात. शेतकऱ्यांचे प्रश्न हाच फक्त एक राजकारणाचा विषय बनला आहे. फक्त टी.व्ही. वर येऊन चर्चा करुन शेतकऱ्यांची प्रश्न सुटणार नाहित. तर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन एक दिवस शेतामध्ये त्यांच्याबरोबर राबून बघा, रात्री अपरात्री दारं धरुन बघा, रात्री आपरात्री अंधारात बंद पडलेल्या मोटारीमध्ये पाणी भरुन बघा, रात्री आपरात्री गडयासारखं त्या शेतकऱ्यांच्या माऊलीसारखं कंबरेला खाष्टा बांधून धन्यासोबत जागून लेकरं घरी झोपवून कष्ट करुन बघा. मग समजेल टी.व्ही.वर येऊन चर्चेत बढाया मारणं आणी प्रत्यक्षामध्ये काम करणं यात किती जमीन आसमानचा फरक आहे. स्वार्थासाठी शेतकऱ्यांची ढाल व त्याच्या नरडीला तलवार लावाल तर यादा राखा ! खबरदार शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर ! आठवा हा आवाज,  थांबवा हे सगळं, भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांमुळेच आपण पोटाला पोटभर खाऊ शकतो हे विसरु नका आणि टी.व्ही. वर चर्चा करण्यापेक्षा कधी शेतकऱ्यांना पण मीडीयाच्या स्टुडीओ मध्ये बोलावा. ज्यांनी ज्यांनी विकासाच्या नावाखाली व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या नावाखाली मतं लाटली त्यांची पोली खोलण्यांची संधी शेतकऱ्यांना दिली तर नक्कीच शेतकऱ्यांना थेट त्यांच्या स्वत:च्या व्यथा शासनासमोर मांडता येतील. तसेच स्वार्थासाठी सोंग घेणाऱ्या व दुसऱ्याच्या खांदयावर बंदूक ठेवणाऱ्यां स्वप्रसिध्दीसाठी कोणत्याही स्तराला जाणाऱ्या मानवी व्यवस्थेला शेतकरी कधीच बळी पडणार नाही. नेहमी नेहमी शासनावर टिका करुन करुन अनेक लेखांमधून शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त होत आहेत. मात्र याचा कोणालाच काही फरक पडत नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या नावाने पक्ष, संघटना काढून नेत्यांची जोरदार दुकानं चालू केली आहेत. उठ सूट फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राजकारण करायचं ! पण या सर्वांमध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं याचा कधी कोणी विचार केलाय का ? शेतकऱ्यांना मासिक वेतन देऊ म्हणणाऱ्यांनी गादीवर बसून राज्याकारभार करतांना आपण दिलेल्या शब्द बदलला. निवडणुक काळामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने एरवी बोंबाबोंब करणारे पक्ष, संघटना ऐन वेळी पेटया घेऊन पाठींबा देतात व आपण सारे मिळून खाऊ ! असं वागायलाला लागतात. शेतकऱ्यांना पेरणी काळात खतं बियाणं महाग करणारे व्यापारी, विजवितरण कंपन्या हे सुध्दा शेतकऱ्यांच्या आत्महत्येला तेवढेच जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची मुलं सुध्दा जास्त शिकत नाहीत. त्यांना चार पाच लाख रुपये देऊन ऐशोआरामातली कॉलेजं नशिब नसतात. विदेशात शिकायला मुलाला ठेवणं ही तर शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या स्वप्नांत सुध्दा कधी येत नसेल. त्यात दुष्काळ, सततची नापीकी, या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचा मार्ग धरेल नाही तर काय करील. त्याला जीवनंतपणी आधाराची खरी गरज आहे मेल्यावर नाही ! शेतकऱ्यांची मुलाखत घेतली की त्या मुलाखतीच्या शेवटी पुढाऱ्यांचा, शेतकरी पक्ष, संघटनेच्या अभिप्रायाची कशाला गरज भासते कोणास ठाऊक, इथं शेतकरी हुशार की,  शेतकरी नेता त्यापेक्षा जास्त हुशार हेच कळत नाही.  असो !  

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?