किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा !
किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा !
-देशात दर 4 मिनीटात एक रोड
अपघाताचा बळी-
वर्तमानपत्र
उघडले, टी.व्ही चालू केला, सोशल मिडीयासह विविध माध्यमांमधून देशभरामध्ये अपघाताच्या
घटना पहावयास मिळतात. त्या इतक्या भयानक असतात की, पाहिल्यास मन उदास व जमीन पाय ठेवू
देणार नाही. रोज किडया-मुंग्यांसारखी माणसं मरतांना आपण पाहतो, वाचतो, ऐकतो व नकळत
विसरुनही जातो. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. नेमके अपघात का
होतात व त्यासाठी उपाययोजना म्हणून ठोस पाऊल उचलत नाहीत किंवा एखादा सक्षम पर्याय शोधत
नाहीत. देशात रोज किती तरी निर्दोश लोकं या अपघातासारख्या बकासुरास बळी पडतात. कधी
समोरचा वाहन नीट चालवत नाही, कधी वाहन चालकच मद्यपान करुन वाहन चालावतो, कधी मोबाईल
वर बोलतांना, तर कधी रात्रभर वाहन चालवल्यामुळे पहाटेच्या डुलगी लागल्यामुळे अशा विविध
प्रकारचे कारणे अपघात होण्यासाठी पुरेशी आहेत. प्रत्येकवेळी शासनालाच दोष देणं फारसं
चुकीचं ठरतं. जीव आपला आहे, शासनाचा नाही हे आपण कुठंतरी पार विसरुन गेलो आहोत. लक्ष
आपले वाहन नीट चालवण्याकडे नसून धावपळ, घाई, व लवकर पोहोचणे याकडे जास्त असते. हल्ली
तर माझ्याकडे वेळच नाही बुवा !, मी फक्त दहा मिनीटांत नाही पोहोचलो तर माझे फार मोठे
नुकसान होईल !, मला मीटींगला जायचं आहे नाही पोहोचलो तर मला त्याचा फटका बसेल असे विविध
सवाल मनामध्ये असतात. परंतू आपल्या जीवाची पर्वा न करता आपण अशा कारणांमुळे किडयामुंग्यासारख्या
मरणाला बळी पडतो. आपला जन्म यासाठीच झाला आहे का ? मोटारसायकलवर हेल्मेट ही बाब आपल्या
सुरक्षीततेसाठी आहे हे न समजून घेता फक्त ट्राफीक पोलीस व आर.टी.ओ. अधिकाऱ्यांनी पकडून
नये म्हणून हेल्मेट घालायचे असते आपल्याला एवढेच माहित आहे. हे फार चुकीचे व गैरवर्तन
आहे हे मुळात समजून घेतले पाहिजे. योग्य वेळी हेल्मेट कामी येऊन आपला जीव अपघात होण्यापासून
वाचू शकतो, अपघात हा अपघातच, तो सांगून किंवा ठरवून होणारी बाब नाही. त्यामुळे आपण
कोणत्याही प्रकारचे वाहन चालवितांना काळजी घेणे फार महत्वाचे असते. प्रवाशी वाहतूक
करणारे सुध्दा बऱ्याच वेळे पैशाला पैसा जोडण्यासाठी जशा खुराडयामध्ये कोंबडया कोंबाव्या
तशा वाहनांमध्ये माणसांची कोंबा कोंब सुरू असते. पोलीस किंवा आर.टी.ओ. अधिकारी भेटले
की त्यांच्या हातावर कागदी लालाच ठेवली की जमलेच पण त्याला हे माहित नसतं की आपल्या
या अशा वागण्याणे अनेकांची संसार उध्वस्त होऊ शकतात, आपल्या अशा मनोवृत्तीमुळे अनेकांचे
प्राण आपल्या स्वत:सह जावू शकतात. आपण स्वत: नियमांचे उल्लंघन करत बसतो मग प्रशासनाला
दोष देऊन काय उपयोग आहे का ? वाहनांचे स्टंट करणं, कॉलेजची पोरं भरधाव मोटार सायकल
चालवून एकमेकांना ओव्हरटेक करणं, लवकर पोहचण्यासाठी अतिवेगवान वाहनं चालवणं, मोबाईलवर
बोलत बोलत समोर येणाऱ्या वाहनांकडे लक्ष न देणे, मद्यपान करुन वाहन चालवणे, वाहतुकीच्या
नियमाचं उल्लंघण करणे, सिग्नल न पाहता त्याचं उल्लंघन करणे ही कारणं मरण मागण्यासाठी
पुरेसी आहेत. देशामध्ये कित्येक अपघात आपण दररोज पाहतो काही अपघात हे शासनाच्या चुकांमुळे
सुध्दा होतातच, रस्त्यावर खडडे, काही गतिरोधकांवर झेब्रा क्रॉसींग नसणे, सिग्नलचा अभाव,
दर्शक फलक नसणे इ. बरीच कारणे आहेत की शासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेक निर्दोष माणसांची
प्राण त्यांना गमवावे लागले आहेत. जीवनात आल्यानंतर जीवन फार सुंदर आहे ते सुंदर पध्दतीने
जगले पाहिजे हे जेव्हा माणवाला कळेल तेव्हा अशा अपघातांवर मात करण्यास तो स्वत:च सक्षम
होईल. तेव्हाच त्याच्या तोंडून आपल्याला ऐकावयास मिळेल की, किडया-मुंग्यांसारखे मरण
नको रे बाबा !
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment