कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता
लोकशाहीचा चौथा
स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला दर्पण म्हणतो, त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लोकशाहीचा
व कर्तव्याचा हल्ली विसर पडल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे एक पाऊल जनतेच्या
हितासाठी, अशी शपथ घेतलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आपण कशा प्रकारची पत्रकारिता,
कशाप्रकारचे कर्तव्य बजावतोय, याचाच जणू विसर पडला आहे. उगाच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर
तोंडसुख न घेता खरंच त्याच्याकडून काही नकळत होत चुकांसाठी हा शब्दप्रपंच. अगदी थोडक्यात
आणि स्पष्ट. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला देशात एक वेगळे स्थान आहे. त्याची एक वेगळीच
ओळख आहे. ती ओळख निर्माण झाली ती त्याच्या कर्तव्यामुळे, तो त्या क्षेत्रात कार्य करत
असल्यामुळे, लोकशाहीचा अर्थ आरसा, दर्पण. त्याच्याकडे पाहिलं की अन्याय झालेल्याला
न्याय नक्कीच मिळणार आहे याचं समाधान असतं. त्याला मिळणारे समाधान हे पत्रकारितेत कार्यरत
असलेल्या स्वच्छ पाण्याप्रमाणे, पारदर्शी कर्तव्य करणाऱ्या पत्रकाराकडून मिळते. पण
हल्ली याची व्याख्या काही वेगळी झाली आहे, हा खरंच चिंतन करण्याचा विषय आहे. ज्या गोष्टी
समाजाला पत्रकारांकडून अपेक्षित आहेत. त्या गोष्टीं न होता पत्रकारितेतून भलतीकडे अशी
व्याख्या बनली आहे. पत्रकारिता हा व्यवसाय बनत चालला असल्यामुळे ही चिंतनाची बाब तर
आहेच शिवाय याकडे गंभीरतेने हे पाहिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला एखादे काम सांगितले
व त्याला ते पूर्ण करण्यासाठी जबाबदारी सोपवली असताना तो ती जबाबदारी पार न पाडता वेगळंच
काहीतरी करत बसलाय. असत्याला सत्य हरवतं असं म्हणतात, सत्याची कास धरून चालणारा लोकशाहीचा
चौथा स्तंभ हल्ली राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झालाय. तो म्हणेल ती पूर्वदिशा असा
पावित्रा त्याने घेतला आहे. तो त्यांच्या पायाभोवती इकडेतिकडे घुटमळत असतो आणि हे सत्य
आहे. पत्रकार बातमी लिहितो, त्या बातमीला जिवंतपणा देण्याचं काम करतो, पण वाचक जेव्हा
ती बातमी वाचत असतो तेव्हा ती बातमी जिवंत आहेत की मेलेली आहे हे एक एक वाचकच ठरतो.
अगदी शेवटचा वाचक. परंपरेने घालून दिलेली काही तत्वं आहेत, या तत्त्वांच्या चौकटीमध्ये
काम करणं ही खरंच तारेवरची कसरत. ज्यांना ज्यांना ही कसरत जमली तो खरा लोकशाहीचा आधार
ठरलाय. देशातील अवैध धंदे, गुन्हेगारी वृत्ती, भ्रष्ट व्यवस्था यांच्या विरुद्ध लढणारा
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार. आज तोच हरवला आहे. ही त्याची झाली एक बाजू काही
चांगले ही पत्रकार आहेत, ते त्यांचं कर्तव्य अगदी तंतोतंत, निस्वार्थ, वंचितांना न्याय
देण्यासाठी, जिवाची पर्वा न करता, रात्रीचा दिवस करून बातमीच्या शोधात असतो व त्याचं
एक पाऊल जनतेच्या हितासाठीच असतं. असे पत्रकार वगळता काही कंठक वृत्तीचे लोक त्यामध्ये
मिसळले आहेत. त्याला आपण तोतया पत्रकार म्हटलं तर वावगे ठरणार नाही. हल्ली तर सोशल
मीडियाच्या यूट्यूब चैनल च्या आधारे स्वतः पत्रकार असल्याचे भासवून जनतेला वेड्यात
काढण्याचं काम दिवसाढवळ्या सुरू केला आहे. त्याच निरागस जनतेची दिशाभूल करण्याचे काम
सुरू आहे. एकूणच यूट्यूब चैनल आणि पत्रकारितेचा तीळमात्रही संबंध नाही सोशल मीडियावर
काम करणाऱ्या व्यक्ती या पत्रकार होऊच कशा शकतात. याचा विचार नक्कीच केला पाहिजे. सोशल
मीडियावर एखादी व्हिडीओ क्लिप तयार करून त्याचा प्रसार करणे म्हणजे पत्रकारिता करणे
नव्हे. एखादा व्यक्ती समाजामध्ये वाईट काम करत असेल व त्याची वाह वाह करण्यासाठी अशा
प्रकारचा बनाव करून जनतेची दिशाभूल व फसवणूक करणारा तो लोकशाहीचा चौथा स्तंभ मुळीच
नाही. सध्या यूट्यूब सारख्या सोशल मीडियाला हाताशी धरून स्वतः रिपोर्टर असल्याचा बनाव
करून सर्वसामान्य जनतेला फसवण्याचा धंदा व त्यांची दिशाभूल करण्याचे षडयंत्र काही तोतया
पत्रकार करत असताना दिसतात. हे सत्य जनतेसमोर मांडण्याचं धाडस कोणीच करत नाही. पण अशा
प्रकारचे सत्य समोर आणण्यासाठी व लढा देण्यासाठी कोणीतरी पाऊल उचलायला हवे. कोणीतरी
अशा बनावट तोतया पत्रकारांना जाब विचारायला हवा. त्यांच्याकडे कायदेशीर परवानगी आहे
का नाही ? याचीही पडताळणी व्हायला हवी व त्यापासून होणारा गैरवापर, जनतेची दिशाभूल
थांबवायला हवी. समाजामध्ये काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, त्यांच्याकडे पैसा भरपूर
असतो, तो पैसा आपल्याला कसा मिळेल याकडे अनेक तोतयांचा कल असणारे काहीजण पत्रकारितेच्या
पवित्र क्षेत्राला काळिमा फासण्याचे काम करत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी
कोणी तरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे. अशा वृत्तीच्या लोकांनी रचलेले षडयंत्र हाणून पाडले
पाहिजे. हे ज्याला जमलं, तो खरा पत्रकार ! राजकारण्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन त्यांच्या
तालावर नाचणारे कधीच सफल होत नसतात. त्यांचा काळ अल्प असतो. तरी पण तेवढ्याच काळामध्ये
ते अनेकांचे नुकसान करून जातात. अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी, ज्यांच्या डोक्यामध्ये
चळवळ आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये लोकशाही बद्दल आपुलकी आहे, सर्वसामान्यांचा कळवळा
आहे, अशांनी अशा प्रकारची अघोरी पत्रकारिता करणाऱ्यांना वेळीच चोप दिला पाहिजे. त्यांना
त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. तर हे सर्व थांबेल. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा ज्यांनी-ज्यांनी
मानली ते कधीही कर्तव्यापासून दूर पळाले नाहीत. त्यांना आपल्या कर्तव्याचा कधीच विसर
पडला नाही. जन्मापासून मरणापर्यंत ते आपलं कर्तव्य बजावत राहिले अशा लोकशाहीत काम करणाऱ्या
वीरांना हजार तोफांची सलामी. वेळीच प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले काम चोख पद्धतीने
केले असते, तर असं म्हणण्याची कधीच वेळ येणार नाही व जनतेची दिशाभूलही नक्कीच थांबेल.
- शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422,
hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment