माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं …
माकडांच्या हातात मोबाईलचं
खोकडं …
तुम्हाला
आश्चर्य वाटलं असेल ! आता हे काय नवीन. पण तुम्ही जे वाचताय ना, ते खरंच आहे. जर माकडांच्या
हातात मोबाईल दिला, तर ते माकड, त्या मोबाईलचं काय करेल ? हे तुम्हाला सांगण्याची मुळीच गरज नाही. कारण माकड
हा प्राणी. त्यामुळे मोबाईल चालवायचा कसा, याचे ज्ञान त्यास नसल्यामुळे तो त्या मोबाईलचे
काहीही करेल, त्याला हवं तसं करेल. तसंच जगामध्ये सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले
असतांना. प्रत्येकजण आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यात भर म्हणून अशीच काही माकडं आपल्या समाजामध्ये
आहेत. जे समाजाची दिशाभूल करण्यासाठी सज्ज असून याच मोबाईलच्या खोकडयाचा वापर वाईट
पध्दतीने करत आहेत. देशात काय परिस्थिती आहे. याचं गांभिर्य व भान असल्याचं या माकडांना
मुळीच दिसून येत नाही. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं असंत तर यांनी असं केलं नसतं
मुळीच. जीवावर बेतण्याची परिस्थीती निर्माण झाली असतांना व्हॉटसॲप, टिकटॉक, फेसबुक,
इन्सटाग्राम, टेलीग्राम व इतर सोशल मिडयाचा वापर करुन काहीजण अफवा पसरवणे, चुकीच्या
माहितीचा प्रसार व प्रचार करणे, एखादा संदेश समाजामध्ये तेढ निर्माण करणारा असतो. त्याची
शहनिशा न करता अनेक ग्रुपवर पाठवणे व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन इतरांना फॉरवर्ड
करणे अशा प्रकारचे माकड चाळे सुरु असल्याचे सध्या दिसून येत आहे. विनाकरण संबंध नसतांनाचे
सुध्दा व्हिडीओ, फोटो एडीट करुन संदर्भ नसतांना कोरोना व्हायरसमुळे असे झाले, अमुक
अमुक ठिकाणी असे घडले, चुकीच्या महितीचे व्हिडीओ व अनेक अशा बनावट चित्रफिती व ध्वनीफितींचा
प्रसार करण्याचं काम काही लोक करत आहेत. मुळात माकडं म्हणजे कोण ? तर समाजातील ज्या
लोकांना मोबाईलचा वापर नेमका कसा करायचा ? कशासाठी करायचा ? चांगल्या गोष्टी काय आहेत
व वाईट काय आहे ? हेच मुळात आजतागायत कळलेलं दिसत नाही. ती सर्वच माकडं, म्हणूनच यांच्यासाठी
माकड हा शब्दप्रयोग. लक्षात घ्या ! यांच्यामुळेच असे नानाविध प्रकार दिवसेंदिवस वाढत
आहेत. त्यास खतपाणी मिळत आहे. हे झालं सोशल
मिडीयाचं.
आता अनेक
दिवसांपासून आपण पाहतोय की, टिकटॉक नावाचं एक ऍप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेच. बोटावर
मोजण्याएवढे अपवाद वगळता. त्यामुळे तर सर्वच दीडजीबी वाले दिडशहाणे स्वत:ला अतिशहणा
समजुन ट्रेंड च्या नावाखाली अनेक अश्लिल विनोद, टिपण्या करुन, प्रँक प्रकार व इतर अशा
प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यामुळे याचा समाजमनावर व येणाऱ्या पिढीवर नक्कीच
शंभर टक्के विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही व होतोय सुध्दा. एवढेच काय तर यात
काही जबाबदार व्यक्ती देखील या टिकटॉकच्या मायाजाळात अडकलेत. ते सुध्दा या माध्यमातून
अश्लिल प्रकारच्या व्हिडीवोचे चित्रीकरण करुन घरातल्या खाजगी गोष्टी या माध्यमातून
चव्हाटयावर मांडताना अनेकदा पाहिलं असेल व आजही सर्वजण पहात आहेत. पण यावर आळा बसणं
सध्या तरी कठीणच दिसतंय. कारण परिस्थिती आता हाताबाहेर निघून गेली आहे. प्रत्येकालाच
आता चांगल्या गोष्टींचा द्वेष वाटत आहे व चावट, अश्लिल विनोद आवडायला लागले आहेत. अगदी
त्याचा मनोरंजन म्हणून स्विकार सर्वांनीच केला आहे. एकूणच सांगायचं झालं तर, चांगल्या विचारांची, सकारात्मक
प्रबोधनाची जागा आता आजच्या पिढीने चावट, पांचट विनोद व अश्लिल संवाद यांनी घेतली आहे.
मुळात चांगल्या गोष्टी, सुविचार, चांगले विचार, चांगली व्याख्यानं, तत्वज्ञान या सगळया
गोष्टी फक्त इतरांना चांगल्या म्हणून सांगण्यासाठीच असतात. मात्र त्याचं अनुकरण स्वत:
कोणीही करायला तयार नाही व धजतही नाही. असं स्पष्टच चित्र अगदी प्रत्येकाच्या डोळयासमोर
आहे. पण सध्या मात्र अशी परिस्थिती आहे की, आता तत्वज्ञान हे दुसऱ्यांना सांगण्यासाठीच
उरलंय. .
अंगप्रदर्शन
करणे ही फॅशन तर आहेच शिवाय ही बाब आता मुलींसाठी
आता अगदी सहज बाब बनली आहे. आता कुठल्याही मान-मर्यादा उरलेल्या नाहीत. अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचा हा उद्रेकच म्हणावा का ? त्यात आणीखी एक म्हणजे जीवघेणा प्रँक प्रकार
नवीन ट्रेंड म्हणून सुरु झाला आहे. त्याबाबत
त न बोललेलंच बरं. देशामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी वा इतर भाषेत आजतागायत अनेक सिनेमे
तयार झाले. पण सिनेमा तयार झाल्यानंतर त्यास मान्यता मिळण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडे
ब्रॉडकास्टींगच्या नियमांतून जावं लागतं. काही
अश्लिल किंवा समाजामध्ये तेंढ निर्माण करणारे डायलॉग त्यात असतील तर सेन्सॉर बोर्ड
अशा नको असणाऱ्या गोष्टी दिग्दर्शकाला किंवा लेखकाला त्या वगळण्याचा आदेश देतं. या
गोष्टी सिनोमांपुरत्याच असायच्या पण बाकीच्या इतर माध्यमांतून अशा प्रकारचे घाण, अश्लिल,
चावट, पांचट विनोदांचे प्रसार व प्रचार होतोय त्याचं काय ? सेन्सॉर बोर्ड व ब्रॉडकास्टींग
मंत्रालय याकडे का बरं डोळेझाक करंत आहे हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न आहे. सध्या रिलीज होणाऱ्या अश्लिल सिनेमांबद़दल तर न बोललेलंच
बरं. कारण सेन्सॉर बोर्ड कसं काय त्यांना परवानग्या देत हे त्यांचं त्यांनाच माहित.
त्याचा लहान मुलांवर, उद्याचा भारत असलेल्या पिढीवर काय परिणाम होईल याचा विचार केलाय?
ही खरंच विचार करायला लावणारी गंभीर अशी बाब आहे. आपल्या पाल्याच्या हो मध्ये हो मिळवत
आता बरेच पालकसुध्दा या प्रवाहात आले आहेत. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीप्रमाणे
हे पालकदेखील आता टिकटॉकवरील माकड होऊन बसले आहेत. टिकटॉकवरील माकडं आणि चार ठिकाणी
वाकडं अशी गत आता त्यांची झाली आहे. न शोभणाऱ्या गोष्टींचा पाईक झालं की असंच होणार.
यात काही गृहीणींचाही समावेश आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आपण
चांगल्या ज्ञानमंदीरात ज्ञान मिळवण्यासाठी पाठवतो. मात्र चांगले संस्कार व्हावेत म्हणून
याच माध्यमाचा चांगला उपयोग करुन खुप काही चांगलं आपण करु शकतो. याचा विचार केला तर
काही बिघडणार नाही. स्वत:च्या फायद्यासाठी हवं तसंच वागायचं. मग त्रास झाला की, सर्व
समाजाला, राष्ट्राला, प्रशासनाला त्यात दोषी मानायचं. याच टिकटॉकवरील बनवलेल्या अश्लिल
व्हिडीओला पाहून आलेल्या प्रतिक्रीया जर तुम्ही वाचल्या, तर तुमचा मेंदूच बंद पडेल.
पर स्त्री मातेसमान असते अशी शिकवण आपल्याला आहे. तसे संस्कार आपले पालक आपल्यावर करतात
पण त्यांच्या शिकवणीतून आपण आज हेच शिकलोत का ? इथे थोडसं आत्मपरिक्षण करायला हवं. आया बहिणींची
लाज वेशीवर टांगतांना पाहून, वा छान ! असं म्हणाणारे आपणच का ते? शप्पथ क्षणभर विश्वासच
बसत नाही. अरे जरा तरी लाज बाळगा रे ! आपल्यालाही आई, बहिण, बायको, मुलगी असते. मात्र
दुसऱ्या स्त्रिला त्या स्त्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर बरेच नालायकं त्या व्हिडीओवर
अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका, टिपण्णी करतात. हे कुठंतरी थांबायला पाहिजे असं नाही
वाटत ? कारण या माध्यमाचा अगदी चांगल्या कामासाठी सुध्दा उपयोग होऊ शकतो.
अनेक विविध
प्रश्नांची उत्तरे, देश विदेशातील चांगल्या स्थळांची माहिती, रोगांची माहिती, आजार
होऊ नये यावर दिशाभूल न करता चांगल्या डॉक्टर व्यक्तींच्या मुलाखती, प्रबोधनात्मक विचार,
चांगले सुविचार, संशोधन केलेल्या व इतरांना अनुभव यावा यासाठी अनुभव कथन, आपल्याकडून
झालेल्या चुका इतरांकडून होऊ नये यासाठी मार्गदर्शन. विद्यार्थ्यांना अभ्यासांत येणाऱ्या
अडचणींचे निराकरण करणारे व्हिडीओ आपण बनवू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयार करणाऱ्यांसाठी,
महापुरुषांचे प्रेरणादायी विचारांचा प्रसार करणारे व्हिडीओ. एखादं पुस्तंक वाचण्यासाठी
प्रवृत्त करणारे अनेक संक्षिप्त स्वरुपाचे कथन सांगणारी स्टोरी. लहान मुलांना तसेच
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन असणारी शेतीविषयक माहिती व्हिडीओ. अशा विविध माध्यमातून
आपण समाजामध्ये चांगल्या गोष्टी करु शकतो. याचंही चिंतन एकदा व्हायलाच हवं. अरे किती
ही विकृती वाढली आहे देशामध्ये, अगदी विकृतीचा कहरच. देशामध्ये अनेक ठिकाणी आत्महत्या
होतात. मानसिक ताणाव, कर्जबाजारीपणा व इतर विविध कारणं आत्महत्या करणारांची असतात.
माणूसकी म्हणून आपण त्यावर काही तरी तोडगा काढू शकतो का ? संकटात सापडलेल्या त्या व्यक्तीला
आपण किंवा समाजाच्या वतीने मदत करु शकतो का
? त्याला खच्चकीरणातून, न्युनगंडातून बाहेर काढू शकतो का ? अशा विविध समस्यांवर सुध्दा याच माध्यमातून आपण
चांगलं देखील काम करु शकतो ही बाब प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे.
तंत्रज्ञान
हे संपूर्ण मानव जातीसाठी एक वरदान आहे. याच तंत्रज्ञानाचा आपण नेहमीचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करुन चांगल्या
सवयी स्वत:ला लावू शकतो. तर संपूर्ण मानवजातीध्ये व राष्ट्रामध्ये बदल नक्कीच होईल.
तेव्हा आपल्याला कोणीच म्हणणार नाही की, माकडांच्या हाता मोबाईलचं खोकडं.
- शंकर चव्हाण,
अंबाजोगाई 9921042422
Comments
Post a Comment