कविता

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
रोज रोज शेतात राब राब राबतोय
कितीही मेहनत घेतली तरी पोटाला आर्धीच खातोय
वाटलं होतं ऐकेल कोणी माझी हाक
होईल कोणी माझ्या आयुष्याच्या प्रगतीचं चाक
पण मला आजवर सगळयांनी दिला ठेंग्याचा हात
माझ्याविषयी सगळयांच्या मनात पापच पाप
पोटभर खाऊन ढेकर देता तुम्ही
शिळया तुकडयावरच दिवस काढतो आम्ही
असाच संसाराचा गाढा हजारो वर्षे ओढतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
दुष्काळ आला, त्याला पाहुणा समजुन पाहुणचार केला
सावकार आला, त्याचाही खिसा भरता केला
अजुनही बँकाची कर्ज फेडतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
एसीत बसुन आमच्यासाठी संघर्षाचं नका घेऊ सोंग
संघर्ष तर आम्ही करतोय, नका करु तुम्ही नुसतंच ढोंग
दुपारचा सुर्य डोक्यावर घ्या
मग कळेल तुम्हाला आम्ही कसे कष्ट करतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
मंत्रालयात बसुन फक्तं बोलनं असतं लई सोप्पं
कितीही खोटी आश्वासनं दिले तरीही आम्ही आजवर गप्पं
आम्ही काय गुन्हा केला तुमच्याकडं नाही पैका
आमच्यासाठी एकतरी आयोग लागू करा, एवढं तुम्ही ऐका
पोराच्या शिक्षणापाई आज सुध्दा मी आनवाणीच चालतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
सांगता येत न्हाय साहेब कोणती दोर लागेल गळयाला
माझ्या तेराव्याला सुध्दा लाज वाटेल ‘त्या’ कावळयाला
नका खेळू साहेब आमच्या भावनांशी,
एक तरी घास जाऊदया आमच्या मुखाशी
तुम्ही सत्तेतले अन विरोधातले मात्र सगळेच तुपाशी
आम्ही काढल्या कित्येक रात्री  उपाशी
उदयाचा दिवस चांगला येईल म्हणून रात्री सगळं गप गिळून झोपतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
व्यथा आमच्या फक्त जाणून घेता
हातामध्ये आश्वासनाचं आम्हाला लाल गाजर देता
निवडणुकीपुरताच विषय बनतो आम्ही
सांगा साहेब आमची कधी किव करणार तुम्ही
लेकरांना सांभाळ गं ! शेवटी कारभारणीला सांगातोय
या सर्वाला कंटाळून मी आत्महत्येचा मार्ग धरतोय
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …
मला वाचवा साहेब, देशाला गरज आहे पोशिंदयाची
आत्ता खरंच गरज आहे आम्हाला तुमच्या मदतीची
जाता जाता शेवटचं एवढंच सांगतोय

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …


-       शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422



ताई
अवकाशातील ताऱ्यांचं चांदणं
नात्यांचे पलिकडचं ग तुझंवागणं

बहिणीची माया पातळ होऊ नको देऊ
नात्यां मधल्या दुराव्यास जागा नको देऊ

नदीकाठच्या गारव्यांसारखी तुझी काया
आई पेक्षाही श्रेष्ठ गं असते तुझी माया

किर किर राती काजव्याचा आधार तू
करिन रक्षा तुझी रहा बिनधास्त तू

जल प्रेमळ अन नितळ असले जरी
या कलयुगात विश्वास नको ठेऊ मानवावरी

आयुष्यभर हवे तुझे प्रेम मज
श्रेष्ठ वाटते हज अन चारधामहून मज

डोळयात पाणी कधी आणू नकोस
भाऊ आहे पाठीराखा कशालाही भिवू नकोस

-       शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422


"सावर स्वत:ला ..."

सांगितले मी स्वत:ला, होईल रे सर्व काही ठिक
बघ जरा त्या मुंगीकडे, तिच्याकडून काही तरी शिक

असतात रे प्रत्येकालाच कामं, नको निराश होऊ
कर संकटाचा सामना, नंतरचं नंतरच पाहू

अतसो तो प्रत्येक दिवस वेगळा, कधी उत्साह तर कधी निराशा
कष्टाचे भांडवल कर, होईल सर्व ठिक, नको सोडू तू आशा

मीच सांगतोय तुला आज ना उदया काम मिळेल हाताला
येतात रे प्रत्यकाचे ‘ते’ दिवस आता सावर स्वत:ला, सावर स्वत:ला



- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422


जीवन कवींचे

रसिक श्रोत्यांची हवी असते कवीला दाद
शब्दाशब्दात आपुलकीचा स्पर्श करतो स्वाद

कविता म्हणजे कवींचे असते जीवन
सुख शांती साठी नाही करावा लागत होम हवन

स्पष्ट, निखळ, स्वच्छ, पारदर्शी जगतो आम्ही जीवन
कवितेच्या श्वासातच पूर्ण होते जीवन

- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422


त्याग
कधी कधी व्यक्त व्हावं लागतं
कधी खोटं कधी खरं बोलावं लागतं
दुखः तर झालंय,
वेळ आलीय एका सुखाचा त्याग करण्याची
एका सुखाला कवटाळण्याची
कसं वाटत असेल त्या मनाला
कसं समजावलं असेल मी त्याला
क्षणात एक सुख नव्हतं झालं
एकासाठी एकाचा त्याग करून,
डोळ्यातलं पाणीसुद्धा पळालं
आव्हान तर स्विकारावंच लागणार
पदरात पडलं ते घ्यावंच लागणार
कारण, आयुष्याच्या वळणावर
खोट्यासाठी खरं बोलावं लागणार
- शंकर चव्हाण, 9921042422


लढ गड्या तू ...

लढ गड्या तू ,  तुला कोणी हरवणार नाही
विजेता तूच होणार, देतो तुला मी ग्वाही

उंच भरारी घे, घे तू गंगनचुंबी
लढ गड्या तू, तुझ्या पाठीशी खंबीर आम्ही

नकळत डोळ्यात कधी आले अश्रू तर
धट्ट मनाने त्या अश्रूंना सावर

लढण्याची जिद्द मनात ठेवायची,
भीती तुला गड्या रे कशाची
साथ आहे तुला लोकशाहीची

- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422


सहज सुचलं …

कौतुक ही कवीच्या
पाठीवरची थाप असते

प्रेरणेने उत्साह वाढत
जाण्याची आस असते

वाचकांनी दिलेली दाद
हीच खरी साथ असते

पुन्ह्यांना कविता खास होण्याची
शक्यता दाट असते

-     - शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव …

जवा दुकानतल्या बियाण्याला असतुया भाव
अन पिकवीलेल्या पिकाचा घसरतो भाव 
तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव

नका काढू राव त्या पावसाचे नाव
त्याच्या अंगात आता नुसताच भरलाय बाव
जवा उन्हाळयागत रक रक करतंय गाव
असं गांव जवा डोळयानं बघवत  नाय राव
तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव

पाऊस का पडना राव, 
ते कुणास तरी हाय का ठाव ?
पावसाळा संपला तरी,
 त्याचा काई ठिकाणाच न्हाई राव
तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव

मला वाटलं त्यानं बी पक्ष बदलला की काय ?
पडतोय तिकडंच पडतोय गावोगाव,
अन, आमचं मात्र करतोय दुष्काळगाव …
तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव

ढगामंदी तवा इमाईन आलं होतं राव
पैसं बी खर्चीले तवा, पर साधला नाही डाव
तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव

आता तरी पड की बाबा,  जीव घेतो का काय ?
तुला देईन म्या पैसं, ते आता खोटं व्हनार न्हाय 

मी पावसाला ईचारलं, तु असा कसा आगावैस राव
त्यो मला मनला, आधी तू रोपटं लाव 
अन, मला ते झाड झालेलं दाव 
पुन्हयांदा म्हणू नको मला 
आता मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव
मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव

- कवि, शंकर चव्हाण, अंबाजोगाई – 9921042422
- Email : hr.shankarchavan@gmail.com

मन अस्वस्थ होतंय राव

आज खुप अस्वस्थ वाटतंय राव, 
का ? कुणास ठाऊक ? 
पण गुदमरल्यासारखं होतंय राव ! 
जणू आता सगळंच संपलंय ! 
मेंदू बंद पडल्यागत वाटतंय राव, 
का ? कुणास ठाऊक ? 
पण जीवनात कुठंतरी काहीतरी 
बिनसल्यागत वाटतंय राव !
मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव ... 
कुणाच्या कर्माचे खापर कुणाच्या माथ्यावर ?
डोळयादेखत निष्पाप जातोय सरणावर. 
ज्याला त्याला आपलाच जीव प्यारा
ना मोर्चा, ना दिसेना कुठेच जयघोष नारा
सर्वांचा विचार आता एकच
संपणार आता सगळं डोळयादेखत
मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव ...  
निसर्गाशी स्वार्थी खेळ मांडलास तू,
जसं हवं तसंच केलंस तू, 
निसर्गाच्या मना विरुद्ध सारचं चालवलंस तू,
अन आता का रडतोस तु ? 
पशु, पक्षी मागत होते जेंव्हा तुझ्याकडे 
त्यांच्या जीवाची भिक,
तेंव्हा नाही वागला त्यांच्यासोबत तू नीट 
आता तरी बाबा एवढयातुन काहीतरी शिक!
निसर्गाच्या विरुद्ध चालणार्‍या,
तुझी रे कशाला आता किव
तुझ्यामुळेच जाणार आता निष्पपांचे जीव
मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव...
मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव...

 कवी -  - शंकर चव्हाण, अंबाजोगाई • 9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी