राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ...
राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ...
महाराष्ट्र राज्यामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या गंभीर विषयाला राज्य मंत्रिमंडळामध्ये व शासन दरबारी वाचा फोडायला कोणीच तयार होताना दिसत नाही. दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वसामान्य जनता, निर्दोष बालके यांची हत्याकांडं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. या अपघातांवर तोडगा काढायचा कधी ? असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे. अपघात कशामुळे होतात ? त्याची कारणं काय आहेत ? या विषयाकडे जरा स्वतःचा प्रश्न असल्याप्रमाणे पाहिल्यास तोडगा नक्कीच निघेल व अपघातांचे प्रमाण आपोआप कमी होण्यास नक्कीच मदत होईल यात तिळमात्र शंका नाही. राज्याचे परिवहन मंत्री आश्वासनांचं नेहमीच गाजर देतात. त्यांना कोणी फोन केल्यास ते सांगतात अपघात कमी करण्यासाठी आम्ही आमचे वतीने सर्व प्रयत्न करत आहोत असे बोलण्यात येते, त्यात वाहतूक प्रशासन हेसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. हल्ली तर राज्य परिवहन मंडळाच्या बस यांच्या अपघाताचा आलेख उच्च स्तरावर आहे. बसचा अपघात होण्याची कारणे पाहिली असता सध्याचे बस चालक हे तरुण वयातील असल्यामुळे भरधाव बस चालवणे, ओव्हरटेक करणे असे प्रकार करत असल्यामुळे अपघात जास्तीच्या प्रमाणात होत होत असल्याचे दिसून आले. केवळ बस नाही तर खाजगी वाहन चालक सुद्धा मद्यपान करून भरधाव वेगामध्ये वाहन चालवण्याचा त्यांनी पायंडा पाडला आहे. इथे कुणालाच कुणाच्या जीवाची पर्वा नाही. लहान लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य निर्दोष जनतेचे रस्त्यावर रक्ताचे पाट वाहू लागले आहेत, याचे कोणालाच देणेघेणे नाही. जणू या भूतलावरील माणुसकी हरवली आहे. वाचताना, बोलतांना ऐकू न वाटणाऱ्या घटना आपल्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या घडत आहेत. तरीही कोणीही काहीही करू शकत नाहीत हेच दुर्दैव आहे. दुचाकी चालक मद्यपान करून वाहन चालवतात, हेल्मेट घालत नाहीत, वाहतुकीचे कुठलेही नियम पाळायला तयार नाहीत, जणू वाहन चालवण्याची इथे स्पर्धाच भरली आहे, प्रत्येकाला घाई आहे, हीच घाई प्रत्येकाला देवा घरी नेऊन सोडण्याचा मार्ग बनली आहे. आपल्या घरी आपली कोणीतरी वाट पाहतंय हे सर्वच जण विसरून गेले आहेत. रस्त्यावर किड्यामुंग्यांसारखी मुडदे पडत आहेत. रस्ते रक्तरंजित होताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. चिमुकल्यांचे मृतदेह ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे त्यांच्यासुद्धा चिंधड्या चिंधड्या झालेले आपण उघड्या डोळ्यांनी पहातये. जीव अगदी कासावीस होतो काळजाला भेदून जाणारा हाच ताे प्रसंग ? याचसाठी का जन्म आपुला?? वाहतुकीचे नियम का असतात ? ते फक्त तोडण्यासाठी येवढेच सर्वांना माहीत आहे. पण त्या वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर आपण आपला जीव वाचवू शकतो एवढा साधे ज्ञान कोणालाच का बरे कसे कळत नसावे ?? किड्यामुंग्यांसारखी निर्दोष जनता ही भर रस्त्यामध्ये टाहो फोडते आहे, जीवाची भीक मागत आहे, तरीही कोणाच्याही अंत:करणाला पाझर फुटत नाही. दिवसाला कित्येक लोक हे अपघातामध्ये मरण पावतात, कधी आजारपणाने मरण्याचे प्रमाण कमी व अपघाताने मरण्याचे प्रमाण हे जास्त आहे. सर्वात जास्त अपघात होण्याची कारणे ही खड्डे पडलेले रस्ते, शासन बांधकाम विभागामार्फत खासगी कंत्राटदारांना रस्त्याचे काम देते, खाजगी कंपन्यांना काम देते, हे ठेकेदार फक्त पैसे खायचे काम करतात, निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवतात व निर्दोष बळी जाणाऱ्यांच्या जीवाशी खेळतात, एका वर्षाच्या आत हेच रस्ते आपले प्राण सोडतात तर त्यापुढे माणसाचा जीव काय आहे ? मद्यपान करून वाहन चालवणे हे कधीही धोक्याचे, कोणाकडे लायसन नाही, कोणाकडे एकमेकांसाठी थांबायला वेळ नाही, कोणाकडे एकमेकांसाठी एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी वेळ नाही. हा वेळ नावाचा त्याच्या तालावर नाचवणारा राक्षास आपल्या जीवनात असल्यामुळे अपघात होणारच.अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. व का टाकू नये, टाकलेच पाहिजे, ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाला, मंत्र्यांना, पुढाऱ्यांना शिव्या घालून काहीही उपयोग होणार नाही. प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने वागल्यास अशा प्रकारचे निर्दोष बळी जाणार नाहीत व पुन्हा आपणच राज्यात अपघाताचे प्रमाण कमी होता होईनात असेही म्हणणार नाहीत.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment