मराठवाडयाच्या वाट्याला दुष्काळाचे भोग


मराठवाडयाच्या वाट्याला दुष्काळाचे भोग

धोक्याचे संकेत - येत्या तीस वर्षात मराठवाडयाचे वाळवंट होणार

पाणी, पाणी, पाणी, करुन जनावरं, माणसं मरणाऱ्या वाटेवर येऊन थांबली आहेत. मराठवाडयात ‘पाणी’ ही वस्तुस्थिती लाख मोलाची बनली आहे. पाऊस पडेना म्हणून शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतमजूरांच्या हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही, प्रदुषणामुळे ओझोनचा थर कमी झाला असल्याने सुर्यप्रकाश किरणांचा प्रादुर्भाव वाढला. जमीनीचे बाष्पीभवन होऊ लागले, वृक्षतोड तोठया प्रमाणात होऊ लागली.  स्वत:च्या स्वार्थासाठी मनुष्याने जंगल उध्दवस्थ करुन खंडन केले. पावसाअभावी नदया, तलाव, धरणं कोरडीठाक झाली. गेल्या सततच्या सहा वर्षे पावसाच्या अभावामुळे दुष्काळाने मराठवाडयाची ‘दुष्काळवाडा’ नावाने ओळख पडली. जसं जम्मू काश्मिर बर्फाळ प्रदेश, राजस्थान वाळवंट, केरळ पाऊस तसेच मराठवाडा ‘दुष्काळ’ असं सुत्र बनलं. आपण फक्त म्हणतो की झाड लावलं पाहिजे, पर्यावरणाचे संतूलन राखून ते टिकवलं पाहिजे व लावलेलं झाड जगवलं पाहिजे. मात्र प्रत्यक्षात याची अमलबजावणी होतांना दिसत नाही. उगीच सरकारच्या नावाने खडे फोडन्यात माणूस हा सर्वात पुढे असतो. स्वत:च्या घराचा व सभोवतालचा परिसर जर एका घरातल्या एका व्यक्तीने हिरवा करायचा ठरवला तर पर्यावरण व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून अमुलाग्र बदल होऊ शकतो यात तीळमात्र शंक्काच नाही. घाणीचं साम्राज्य करायला माणूस पुढे, झाडं तोडायला माणूस पुढे, प्राचीन शिल्पांची, वास्तूंची खराबी करण्यात माणूस पुढे, पाण्याचा अपव्यवय करण्यासाठी माणूस पुढे, स्वत:च्या स्वार्थासाठी रसायनांचा वापर करुन पर्यावरणात बाधा आणण्यासाठी माणूस पुढे, दुष्काळाला सर्वस्वी जबाबदार आपणच आहेत हे अगोदर समजून घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करायला हवी. एवढी साधी आणि सोपी गोष्ट या मानवाच्या डोक्यात कधी येणार देव जाणे ? उगीच कोणतीही गोष्टी करण्यासाठी सरकारच कशाला हवे ? श्रमदानातून काम हे तत्व केंव्हा आमलात आणणार ?, ‘एक माणूस एक झाड’ याचं पालन केंव्हा करणार ?, दुष्काळ पडणार आहे याबाबत मानवाची दुरदृष्टी काय झोपा काढत होती का ? आणखी वेळ गेली नाही तरी सुध्दा आपण झोपा काढतोयत का ? पुढील पिढीसाठी आपण चांगल्या गोष्टी करण्याची आश्वासनं देतो, इतिहास लिहितो पण त्याचं प्रत्यक्षदर्शी रुप म्हणजे ‘दुष्काळ’. काही शास्त्रज्ञांनी मराठवाडयाबाबात धोक्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीवरुन गेल्या कांही वर्षापूर्वीच सांगितेली ही गोष्ट अशी की, येत्या पन्नास वर्षाच्या काळात मराठवाडयाचे वाळवंट होणार. पण आता या गोष्टीला झालीत वीस वर्षे आणि आता राहिली तीस वर्ष म्हणूनच येत्या तीस वर्षात मराठवाडयाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच. कारण भौगोलिक परिस्थितीचा जर सहज अभ्यास केला तर मराठवाडयात एकाही धरणाने पाण्याची पातळी पाहिजे तितक्या प्रमाणात गाठलेली नाही. काही धरणं, तलावं, नदया कोरडयाठाक पडल्या असून सध्या तरी पावसाची चिन्हं दिसून येत नाहीत. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’, शेततळे, जलयुक्त शिवार अशा विविध प्रकारच्या शासनाने योजना राबवल्या, त्या आमलात आणल्या सुध्दा, भ्रष्टाचारामुळे व पैशांचा घोळ झाल्यामुळे त्याचा पुरेसा व मुबलक फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाच नाही हा अपवाद. ज्या ठिकाणी धरणं, तलाव व पाणी साठा करण्यासाठी योग्य त्या सुविधा सुध्दा शासनाने वेळोवेळी पैसा खर्च करुन सोय करायला पाहिजे त्याठिकाणी केल्या नसल्याने मराठवाडयाच्या वाटयाला दुष्काळाचे भोग आलेत हे मात्र नक्की, पण जनता तरी काय करणार, धरण, तलाव बांधनं ही काही सोपी बाब नाही कोटयावधी पैसा लागतो आणि तो पैसा शासनाकडे असल्याने त्यांच्याकडे सर्वसामान्यांना आपल्या हितासाठी काही तरी या शासनाने करावे त्यासाठी पदर पसरावाच लागतो. शासन दरबारी ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्या ठिकाणचे आमदार, खासदार मंत्रीमंडळात जेंव्हा प्रश्न मांडतात, मंजुऱ्या घेतात, दलालांना निवीदा देऊन कामं देतात. तेंव्हा यात भ्रष्टाचार होऊन काही योजना कागदावरच दिसून येतात. यामुळे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी बंधारे, धरणं, तलाव, नदया झाल्या नाहीत त्या ठिकाणी दुष्काळाचा फटका का नाही बसणार ? आणि त्यात सर्वांत मोठे कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड, वृक्षतोडीच्या प्रमाणात वृक्षलागवड फक्त 4 टक्के असल्याचे समजते. यापुढे तर पाऊस पडणारच नसल्याचे धोक्याचे संकेत दिसून आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन आत्महत्येच्या वाटेवर येऊन थांबला आहे. व दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. आपणच खुनी आहोत, आपणच आत्महत्या करण्यासाठी मजबुर केलं त्यांना, असंच म्हणावं लागेल. कारण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण काहीच पाऊलं उचलंत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. तरुण पीढीला तर या गोष्टीचे गांभिर्यच नसल्याचे दिसून येते. स्मार्टफोनमुळं पर्यावरणाचं काय होतं आणि काय नाही, याच्याशी काहीही त्यांच घेणं देणं नाही असंच वाटायला लागलं आहे. तरुण युवा पिढी हा देशाचा पाया आहे असं आपण म्हणतो, मात्र हा पायाच जर कमकुवत असेल तर देशाचा विकास कसा होईल ? देश मजबुत कसा बनेल ? देशाची प्रगती कशी होईल ? याचाही विचार करायला हवा. पुढारी मंडळीतर सध्या घोटाळयांमध्ये व्यस्त असल्या कारणाने कोणत्याही राजकिय पक्षाबददल बोलणे म्हणजे व्यर्थच. मराठवाडयातील जनतेनं जर असं ठरवलं की, वृक्षतोडीच्या दुप्पटीने झाडं लावायची, प्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या गोष्टींसाठी चोवीस तासांपैकी अर्धातास जर दिला तर येत्या तीस वर्षाचा धोका हा फक्त पाच वर्षात आटोक्यात येईल हे शंभर टक्के सत्य आहे. पण असे होईल का ? यासाठी कोण पुढाकार घेईल ? यामध्ये अडकून न पडता स्वत:पासून परिवर्तन घडवण्यास सुरूवात करा नक्कीच यश येईल व दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करु शकाल. अनेक वृक्षमित्र या मोहिमेत कार्यरत आहेत त्यांच्या सोबतीने ‘गाव तेथे हिरवळ’ या मोहिमेत मोठया संख्येने उपस्थिती दर्शवा व प्रत्यक्ष आमलात आणून किमान आपल्या घरासभोवतालचा परिस्र स्वच्छ, हिरवा, सुंदर दिसेल या दिशेनं वाटचाल असू दया. येत्या काळात निसर्ग नक्कीच तुमचा सोबती असेल. आणि निर्सच आपला सर्वांचा देवता असल्याने त्या देवतेच्या पुजास्वरुपी वृक्षलागवडीकडेच भर दया ही सर्व युवा पिढीला विनंतीच.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?