मदत नको ! कायमचा दिलासा हवाय …
मदत नको ! कायमचा दिलासा हवाय …
अन्न, वस्त्र आणि निवारा या फक्त तीनच मानवाच्या मुलभूत गरजा असून सुध्दा त्या गरजा आपलं कुटूंब सांभाळणाऱ्याला ओझं पेलवत नाही. सर्वसामान्यांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर अवंबून आहे त्यात आता दुष्काळासदृश्य परिस्थितीत मजुरी म्हटलं की मजुरांच्या डोळयातून आश्रू गळू लागतात. याचं कारण म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळं हाताला काम नाही आणि हाताला काम नसल्यामुळं खायला पोटभर अन्न मिळत नाही. वस्त्र मिळत नाही. ज्यांच्याकडं निवाराच नाही त्यांना अन्न मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड त्यामुळं वस्त्र आणि निवारा या दोन गरजा पोटाची आतडी पिळवून बाजूलाच सारावे लागत आहे. आणि ही मराठवाडयाची सत्य परिस्थिती आहे. उघडया डोळयांनी आपण सर्व जण पाहतोय. शेतकरी व शेतमजुर आत्महत्या करत आहे. आत्महत्या करणं हे आता दररोज संध्याकाळ होऊन सकाळ होण्यासारखं सत्र आपण इतक्या आत्महत्या झाल्याने ज्या डोळयात आता पाणीसुध्दा येणं थांबलं, त्याच कोरडया डोळयांनी हे सत्र पहात आहोत. गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी ओला दुष्काळ होता त्यावेळी पाणी खुप होते पण अन्न नव्हेत पण आताचा कोरडा दुष्काळ आहे पाणी नाही आणि अन्न आहे अशी उलट परिस्थिती आहे. अशी अवस्था जर मराठवाडयाची आणखी दोनच वर्षे राहिली तर नक्कीच येणाऱ्या काळात जसं राजस्थान राज्यामध्ये वाळवंट पहावयास मिळत आहे. त्याप्रमाणेच मराठवाडयाचंही वाळवंट होण्यास सुरूवात होईल आणी या भितीपोटी आत्ताच्या वर्षीच अनेकांनी स्थलांतर करण्यास व मराठवाडा सोडण्यास सुरूवात केली आहे. हे स्पष्ट चित्र पाण्याअभावी दिसून येत आहे. प्रत्येक वेळी पुढाऱ्यांनाच का दोष दयायचा ? हा एक गंभीर प्रश्नच आहे. नेहमीच पुढाऱ्यांच्या नावाने खडे फोडायचे हे कितपत योग्य याचं मुल्यमापन करणं जरा कठीणच वाटतं. त्यांनी केलेल्या चुका, त्यांनी केलेले नियोजन, त्यांनी आखलेल्या योजनांचा कितपत सर्वसामान्यांच्या पदरात लाभ मिळाला ? त्यांनी केलेली तुटपुंजी मदत ही कितीजणांपर्यंत पोहोचली.? आत्महत्या केलेल्या कुटूंबना एक एक कोटीचे सत्ताधारी व इतर पक्ष देऊ करत आहेत. हे अगोदर सत्तेत असतांना व सत्तेत येण्यापूर्वी कळले असते तर ? असे विविध प्रश्न वांझ बनले आहेत. शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर सावकाराचे, बँकेचे व इतर वेगवेगळया खाजगी स्वरुपाची कर्ज असतात. शेतकऱ्यांच्या सात बारा सावकाराकडं, बँकेकडं बोझा टाकून गहाण ठेवण्यात आलेल्या असतात. मात्र याबाबत महाराष्ट्र शासन ठोस पावलं उचलतांना दिसत नाही. खरं तर आजतागायत शेतकऱ्यांसाठी व शेतमजुरांसाठी शासनाने शुन्यच काम केलं असं म्हणणं योग्यच वाटतं. उगीच एखादया शेतकऱ्याला मदत करायची आणी त्याचा दिंडोरा जगभर, वृत्तपत्र, सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीयावर पुळचट प्रसिध्दी करायची. ‘जसं आठ आण्याची म्हातारी आणि रुपयाची काठी’ असाच प्रकार पहावयास मिळतोय. यात कितपत तथ्य आहे. ? आजवर शेतकऱ्यांठी व शेतमजुरांसाठी अनेक योजना शासनाने जन्मास घातल्या. मात्र त्या सर्व कागदावरच आणी तालुक्याच्या जिल्याच्या ठिकाणी शासकिय कार्यालयात त्या योजना आजही धूळखात पडलेल्या आहेत. त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या व शेतमजुराच्या हातावर काहीच नाही. रोजगार हमी योजना यासारख्या अनेक शासकीय योजना आहेत. पण गल्ली पासून दिल्ली पर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गिळावू वृत्तीमुळं त्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास होण्यापूर्वीच काढला जातोय. शेतीला पाणी नाही, अवेळी पावसाअभावी त्यात पिकलं तर त्याला भाव मिळत नाही आणि मिळालाच तर त्यातून मिळणारी मिळकत सावकार, बँका व इतर खाजगी वर्ग आहेच गिळायला. मग जगायचं कसं ? यामुळेच शेतकरी व शेतमजुर आत्महत्येसारखा सहज आणि सोपा मार्ग स्विकारतो. तो तर गेलाच पण त्यानं त्याच्या कुटूंबाचा विचार न करता नाविलाजास्तव हा प्रकार केलेला असतो. मग सांत्वन करण्यासाठी आहेच पुढाऱ्यांचा ताफा. सोबत फोटोवाले, मिडीयावाले असतातच यांची पुळचट प्रसिध्दी करायला. एखादया कार्यक्रमाचे यांना निमंत्रण असेल आणि लोकांची गर्दी नसेल तर यांचा रुबाब इतका असतो की काही तरी खोटं कारण सांगून त्या कार्यक्रमास अनुपस्थित राहतात. सर्व सामान्य जनता नेता येणार म्हटल्यावर ताटकळत तासन तास त्यांची वाट पहातो. पण शेवटी तेव्हाही त्याच्या हाती नैराश्यच येतं. निवडणूकपूर्व आश्वासनांची माळ शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या व सर्वसामान्य भोळया भाबडया जनतेच्या गळयात हे लोकं घालतात. आश्वासनं नेहमीचीच ठरलेली, आम्ही रस्ते करु, आम्ही पाण्याचा पुरवठा करु, शेतीसाठी वीज मोफत, प्रत्येकाच्या हाताला काम, मोफत शिक्षण, अच्छे दिन वगैरे वगैरे. पण ही आश्वासने गेली चाळीस वर्ष पूर्ण होतांना तर काही दिसत नाहीत. उलट या गोष्टी अभावी जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकसंख्या वाढ तर ही न थांबणारी गोष्ट. पण त्यासाठी दुरदृष्टी ठेऊन ज्या त्या वेळी योग्य उपायोजना आखणं हे सत्ताधाऱ्यांच काम. कारण हे करण्याची सर्व सुत्रं त्यांच्याच हातात सर्वसमान्य नागरीकांनी सोपलेली असतात. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना नवीन सरकार आलं की, नवीन योजना, नवीन नियम, नवीन कल्पना आणि त्या सुध्दा कागदावरच. येईल ते सरकार लुबाडूच अशी म्हणण्याची वेळ आली आहे कारण. पुढारी, शासकिय कर्मचारी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्ट निघाल्यामुळेच. शेतकऱ्यांच्या भावना दुखाऊ नयेत म्हणून विनाकारण कोणत्याही गोष्टीचा बाऊ करणारी पुढारी मंडळींवरचा विश्वास तर उडालाच आहे. पण त्यांच्यासोबत त्यांची आश्वासनंही होरपळलीत आणि आता त्याचा वास येऊ लागलेला आहे. कारण आता सर्वांना आश्वासनांच कडू पाजण्यापेक्षा कायमचा दिलास हवा आहे आणि तो दिलास जर दिला तरच शेतकरी व शेतमजुर जीवंत असेल. अन्यथा शेतकरी व शेतमजुर जसं डायनासोर आपल्याला संग्राहालयात पहावयास मिळतो तशी अवस्था शेतकरी व शेतमजुराची झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चि. पुढाऱ्यांनो आता कांड करणं थांबवा, पुळचट आश्वासनं देणं थांबवा. शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या व त्यांच्या कुटूंबाशी भावनेचा खेळ करु नका कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो हा निसर्ग नियम आहे आणि हे चक्र कधीही न थांबणारं आहे. नियतीला जाग येऊ दया नाही तर जनता खरंच माफ नाही करणार तुम्हाला ! जनता खरंच माफ नाही करणार तुम्हाला ! जय हिंद, जय महराष्ट्र, जय भारत !
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment