बळीराजाचा सूड व चेष्टा !
बळीराजाचा सूड व चेष्टा !
भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशाच्या प्रगतीत बळीराजाचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांचा अन्नदाता या देशात काडीची किंमत नसलेला आज माझा बळीराजा आत्महत्या करतोय, याची चिंता, काळजी आहे कोणाला ? गेली कित्येक वर्षे बळीराजा आत्महत्या करतोय, तो आत्महत्या का करतोय ? याचे कारण व हा प्रश्न सर्वांनाच माहित आहे. पण आत्महत्येला आळा घालण्याचे काम, तो आत्महत्या का करतोय याचे कारण शोधणे, व या समस्येला कायमस्वरुपी आळा घालणे हे आजपर्यंत कोणाला का जमले नसेल बरे ? भर बाजारात कवडीमोल भावात याचे धान्य खरेदी करुन ते धान्य बाजारात जास्तीच्या दरात विकून दलाली करुन बंगल्यामध्ये ऐशोआरामात राहणाऱ्यांची संख्या या देशात प्रचंड प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना तुच्छ लेखणाऱ्यांनो व त्याच्या जीवावर जगणाऱ्या दलालांनो माणूसकीला जागा, आजपर्यंत माणूसकिला काळीमा फासण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. ज्याच्या आधाराव आज तुम्ही जीवंत आहात त्याला मदत करण्यासाठी तुमची धाव केंव्हा बरे ? का भाजी मंडईत शेतीमधून उन्हा तान्हाचं मेहनत करुन, चिखल गाळ तुडवून, पावसा पाण्याला न जुमानता शहरात तुमच्यापर्यंत आणलेला माल माझ्या बळीराजाकडून कवडी मोल भावात खरेदी करुन त्याची फसवणूक करुन तुम्ही त्याला मदत करताय असं तुम्हाला वाटतंय ? शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून या राज्यात, देशात अनेक भामटे पक्ष, संघटना, संस्था यांनी अगोदरच स्वार्थीपणाचा कळस केला आहे व ढोंगीपणाचे तांडव पूर्वनियोजीत सध्या सुरू आहे. बळीराजाचा तोंडचा घास हिसकावण्याचा त्यांचा हा डाव फार वर्षापासून चाललांय, त्यांना राज्य शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करुन दलाली करयात मागे पुढे न पाहणारे हे दगडाच्या काळजाचे माणूसपण ! संतांची भूमी असलेल्या मराठवाडयात कित्येक वेळेस नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले, शेतजमीतील पिकलेले हिरवेगार पीक भुईसपाट झाले तरी सुध्दा राजकिय खेळीत व प्रशासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे जिल्हा दुष्काटग्रस्त करायला सुध्दा कोणीही हिम्मत दाखवली नाही. त्यात तुटपुंजी मदतही करण्यात आली. जी कि फक्त शेती वर केलेल्या खर्चाच्या पाच पैसे सुध्दा उपयोगाला न येणारी रक्कम होती. या जिल्हातील खासदार, आमदार, विरोधीपक्ष नेते एक हाती सत्ता असून सुध्दा कोणाच्याही मदतीला धावून न जाणारे अनेक प्रकार पहावयास मिळत असतात. घरातील एकमेकांच्या घाणेरडया राजकारणामुळे यांना या गोष्टीकडे वेळच कुठे आहे म्हणा ! असं हल्ली सर्वांनाच वाटायला लागलंय व असं दिसायलाही लागलंय ! अनेकदा शेतजमीनीची भांडणं गावोगावी होत असतात, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, न्यायालय इतर अन्य प्रशासन या समस्येला तात्काळ न्याय देवू शकत नाही व याची आत्मीयतेने व तातडीने दखल घेत नाही ही या देशात असमाधानकारक बाब आहे. कित्येक शेतजमीनीच्या वादातून प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, कित्येक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत, कित्येक भांडणे महसूल प्रशासनाकडे प्रलंबीत आहेत. या भांडणामुळे कित्येक बळीराजाचे प्राण पणाला लागले, कित्येकाचे मारा मारीत जीव गेले, कित्येक जणांनी जीवाला चिंता लावून घेवून मरण पावल्याचे अनेक विविध प्रकार पहावयास मिळतात. त्यात सावकाराचे भूत माझ्या या बळीराजाच्या मानगुटीवर बसलेले आहे.
एखाद्या बळीराजाने जर आत्महत्या केलीच तर विविध क्षेत्रातील मान्यवर येऊन त्याच्या परिवाराला सांत्वन करण्यासाठी त्याची घरी येतात. त्याला आम्ही मदत करुन असं आश्वासनही देतात. कॅमे-यासमोर फोटो काढून, चॅनेलवाल्यांसमोर आपली प्रसध्दी करुन घेण्याचा लाजीरवाणा प्रकार पहावयास मिळतोय. ही मदत नाही वा हे सांत्वन नाही माझ्या बळीराजाची चेष्टा होय ! या बळीराजाला मदत मिळाची तर सोडाच शासकिय कार्यालयात मदत मागायची झाल्यास कागदपत्रे जमा करण्यासाठी जवळपास एक वर्ष सुध्दा कमी पडतं, व मिळणाऱ्या तुटपुंजा रक्कमे पोटी अर्धा खर्च तर तो केंव्हा करतो हे त्यालाही कळत नाही व हा खर्च करण्यासाठी त्याने ही रक्कम सावकाराकडून अथवा शेकडेवारीने कोणाकडून तरी घेतलेली असते. पण प्रशासनाने वेळीच दखल घेवून या गोष्टीकडे नीट लक्ष देवून ही वेळ नाही येणार अशी कार्यवाही केली असती तर काही बिघडलं असतं का ? ह्या फक्त बोलायच्या गोष्टी ! कारण या देशात पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात राब राब राबणारा हा बळीराजाला उद्याची चिंता असते. आपली लेकरं बाळं शिकवायची, त्याचं पालन पोषण करायचं याच्या चिंतेने तो रात्रभर सुखाने झोपत सुध्दा नाही. पण याच्याशी कोणाचे काही घेणे देणे नाही असेच म्हणवे लागेल.
कारण याचा सर्वांनी सूड घेण्याचं ठरवलंय असंच दिसतंय ! पेरणी आली कि त्याला पेरणीसाठी लागणारी खतं बियाणे खरेदी करण्यासाठी सावकाराकडून पैसे घेण्याशिवाय दुसरा तिसरा कोणताच पर्याय नाही, समजा पैसे असले तरी सुध्दा दुकानदार त्याला योग्य भावात बि-बीयाणे देईल तर ..... ! पण असं स्वप्नातही कधी घडत नाही. पण प्रशासनाला याची चिंता आहे किंवा नाही याचीच जास्त चिंता बळीराजा करतांना सध्या दिसतोय. राज्यातील प्रशासनाने शेतक-यांसाठी अल्पदरात बि-बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी उपलब्ध करुन दिली तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पिकाचे नुकसान यामुळे तो तोटयात तर जाणार नाही व झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या
करण्यास तो प्रवृत्त होणार नाही. इतर वेळेही प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचे जेवढे जेवढे नुकसान झाले त्याला तेवढीच मदत आपल्याकडे कधीही होत नाही. व याचे परिक्षण करायला गेलेले अधिकारी बांधावरच फेरफटका मारुन अंदाजीत रक्कमेची मदत त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रताप हल्ली होतोय. अलिशान बंगल्यात राहणाऱ्यांनो ए.सी.त बसुन तुम्ही ज्या भाकरीचा तुकडा मोडता व ढेकर देऊन सुखाची झोप घेता ते श्रम माझ्या बळीराजाने केले त्यामुळेच. त्याच्या इमानदारीला जागा. त्याला मदत करण्यासाठी धावून जा, त्याला काय हवं नको ते पहा, त्याच्या समस्या जाणून घेण्याचा आत्मीयतने नक्कीच प्रयत्न करा. कारण हा माझा भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि हा फक्त आणी फक्त बळीराजाचाच देश आहे. सर्वांनी जरा विचार करा व बळीराजाचा सूड कोणीही घेण्याची हिम्मत करणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे आणि हा आपलाच देश आहे. बळीराजाचा सूड कशा प्रकारे घेतला जातोय ही वस्तूस्थिती आपल्यासमोर मांडायचा या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न करण्यात आला आहे. याचा बोध व याचा सारांश फक्त एवढाच आहे कि आपणा सर्वांना तळमळीने व आत्मीयतेने शेतक-यांवर होणा-या या अन्ययाला न्याय मिळवून देण्यासाठी निस्वार्थ प्रयत्न करावा व सबंध राज्यातील एकही बळीराजा आत्महत्या करणार नाही याची प्रथम जबाबदारी ही आपली आहे. आजपर्यंत ज्या ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या परिवाराला प्रशासनाने लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, लोकशाहीचा चौथा आथारस्तंभ असलेल्यांना सुध्दा तळमळीची विनंती कि आपण आपल्याकडून होईल तेवढी मदत बळीराजापर्यंत पोहचेल यासाठी ठोस पावली उचलावीत व राज्यात अनेक सेवाभावी संस्था ही सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांनीही त्यांच्या परिवाराला फुल नाही तर फुलाची पाकळी या पध्दतीने मदत करुन त्यांची होणारी चेष्टा थांबवावी असे आच खरंच मनापासून वाटत आहे. कारण हा प्रकार ज्यांच्यासोबत घडतो त्यालाच या वेदना माहित असतात. अशा प्रकारचे प्रसंग डोळयासमोर आल्यास डोळयातून दुखाश्रू निघून डोळे ओलेचिंब झाल्याशिवाय राहणार नाहीत. राजकिय वर्तुळातून जरा बाहेर निघून पहा गडयांनो काय चाललंय या जगात. पुरे झाले राजकारण, पुरे झाली आश्वासनं, पुरे झाली चेष्टा !
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment